मंत्रिमंडळ ठरवताना अनपेक्षित डावपेच
By Admin | Updated: May 27, 2014 05:39 IST2014-05-27T05:39:05+5:302014-05-27T05:39:05+5:30
आधीपासून मिळालेल्या संकेतांनुसार वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या भाजपाच्या दोन ज्येष्ठतम नेत्यांना मोदींनी मंत्रिमंडळात घेतले नाही
मंत्रिमंडळ ठरवताना अनपेक्षित डावपेच
नवी दिल्ली : आधीपासून मिळालेल्या संकेतांनुसार वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या भाजपाच्या दोन ज्येष्ठतम नेत्यांना मोदींनी मंत्रिमंडळात घेतले नाही. तसेच इंदूरमधून आठ वेळा निवडून आलेल्या सुमित्रा महाजन व झारखंडचे आदिवासी नेते करिया मुंडा यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. या दोघांपैकी एकाला लोकसभा अध्यक्षपद दिले जाईल, असे समजते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षाची भूमिमा खास करून टीव्ही वाहिन्यांवर दमदारपणे मांडणार्या प्रकाश जावडेकर व निर्मला सितारामन या भाजपाच्या दोन प्रवक्त्यांना, संसदेचे सदस्य नसूनही, मंत्रिपदाची बक्षिशी देण्यात आली आहे. या दोघांना पुढील सहा महिन्यांत लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून आणावे लागेल. अमित शहा व मुख्तार अब्बास नक्वी आणि राजीव प्रताप रुडी या दोन सरचिटणीसांची मंत्रिमंडळातील अनुपस्थितीही लक्षणीय आहे. पण महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी संघटनेची मोठी जबाबदारी सोपविण्यासाठी त्यांना मोकळे ठेवण्यात आल्याचे भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.