तापस पाल यांची बिनशर्त माफी
By Admin | Updated: July 2, 2014 03:38 IST2014-07-02T03:38:22+5:302014-07-02T03:38:22+5:30
चहूबाजूंनी झालेली तीव्र निंदा आणि पक्ष नेतृत्वाकडून झालेली कानउघाडणी यानंतर तृणमूल काँग्रेस खासदार तापस पाल आपल्या वादग्रस्त विधानासंदर्भात बिनशर्त माफी मागितली

तापस पाल यांची बिनशर्त माफी
नवी दिल्ली : चहूबाजूंनी झालेली तीव्र निंदा आणि पक्ष नेतृत्वाकडून झालेली कानउघाडणी यानंतर तृणमूल काँग्रेस खासदार तापस पाल यांनी मार्क्सवादी महिलांवर बलात्कार करा, या आपल्या वादग्रस्त विधानासंदर्भात बिनशर्त माफी मागितली आहे़ माझ्या वक्तव्यामुळे माझे मतदार आणि बंगालच्या जनतेला मान खाली घालावी लागली़ मी मनापासून त्यांची माफी मागतो, असे पाल यांनी मंगळवारी स्पष्ट केले़
पाल यांच्या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर तृणमूल काँग्रेसनेही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत या विधानाबाबत बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले होते़ तत्पूर्वी मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगाने पाल यांना संसदेतून बडतर्फ करण्याची मागणी केली़ माकपा, भाजपा आणि काँग्रेसनेही तापस यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी लावून धरली़
मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगेन जा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करा, असे संतापजनक अन् तेवढेच निंदनीय विधान लोकप्रिय बंगाली अभिनेते व तृणमूल काँग्रेसचे खा. तापस पाल यांनी केले होते़ आज मंगळवारी देशभर त्याचे पडसाद उमटले़ राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख ममता शर्मा यांनी संसदेतून पाल यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली़ भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्मीकांता चावला यांनी तापस पाल यांना गजाआड पाठविण्याची मागणी केली आहे़
पत्नीचा माफीनामा
तापस पाल यांच्यापूर्वी त्यांच्या पत्नी नंदिता पाल यांनी पतीच्या विधानाबाबत माफी मागितली़
राज्य विधानसभेत गोंधळ
तृणमूल खासदार तापस पाल यांच्या वादग्रस्त विधानावरून पश्चिम बंगाल विधानसभेत मंगळवारी जोरदार गोंधळ झाला़ (वृत्तसंस्था)