शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:37 IST2025-10-18T15:36:25+5:302025-10-18T15:37:19+5:30
एका आईने आपल्या विवाहित मुलीचा जीव वाचवण्यासाठी तिला खांद्यावर उचललं, पण मुलीचा रस्त्यातच मृत्यू झाला.

फोटो - अमर उजाला
उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यातील किच्छा येथून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या विवाहित मुलीचा जीव वाचवण्यासाठी तिला खांद्यावर उचललं, पण मुलीचा रस्त्यातच मृत्यू झाला. आई हिरा कली सासरच्या घरातून मुलगी रजनीला घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी चौकशी केली आहे आणि या प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. रजनीवर तिच्या सासरच्यांनी प्रचंड अत्याचार केले होते, त्यानंतर अखेर तिचा मृत्यू झाला. आई आता आपल्या मुलीसाठी न्याय मागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रजनीचं तीन वर्षांपूर्वी विनोदशी लग्न झालं होतं. मुलाला जन्म दिल्यापासून तिची तब्येत होती आहे. सासरच्या लोकांच्या दुर्लक्षामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.
आईला माहिती मिळताच ती लेकीच्या सासरी आली. रजनी बेशुद्ध पडली होती. आईने मुलीला खांद्यावर उचललं आणि दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरू लागली. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी अनेक लोकांकड़े मदत मागितली, पण कोणीही मदत केली नाही. ई-रिक्षा चालकानेही मदत करण्यास नकार दिला.
मुलीला सुशीला तिवारी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. आईने सांगितलं की, "माझ्या मुलीची प्रकृती पाहून मी खूप निराश झाले. मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मला मदत न मिळाल्याने मुलीला वाचवता आलं नाही." घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आणि रजनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.