Uddhav Thackeray not attending Modi's all-party meeting and Pawar will remain present | मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी तर पवार राहणार उपस्थित 
मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी तर पवार राहणार उपस्थित 

नवी दिल्ली - एक देश एक निवडणूकवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे. मात्र या बैठकीपासून विरोधी पक्षाचे नेते दूर जाताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणावरुन ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपापासून लांब राहण्याचं धोरण अंवलंबल आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. 

ममता यांच्यासोबतच परदेश दौऱ्यावर असणारे चंद्राबाबू नायडूदेखील सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा वर्धापनदिन कार्यक्रम असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितले आहे तर आपकडून बैठकीला प्रतिनिधी पाठवला जाईल असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. 

मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहायचं की नाही यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहावं की नाही यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 


मायावती यांनी ट्विट करत ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका देशासाठी आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. ईव्हीएमवरील लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. जर या समस्येवर बैठक बोलविली असती तर मी आर्वजून या बैठकीला उपस्थित राहिले असते. मात्र एक देश एक निवडणूक ही चर्चा खऱ्याअर्थाने गरिबी, महागाई, बेरोजगारी, वाढता हिंसाचार अशा ज्वलंत राष्ट्रीय समस्यांवरुन लक्ष हटविण्यासाठी पुढे केली जात असल्याचा आरोप बसपा प्रमुख मायावती यांनी केला आहे.  


 

दुपारी 3 वाजता संसद भवनाच्या लायब्रेरीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. पंतप्रधानांनी बोलविलेल्या या सर्वपक्षीय बैठकीत एक देश, एक निवडणूक याव्यतिरिक्त 2022 मध्ये भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत, तसेच महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. 


Web Title: Uddhav Thackeray not attending Modi's all-party meeting and Pawar will remain present
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.