“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:39 IST2025-08-07T12:36:11+5:302025-08-07T12:39:38+5:30
Uddhav Thackeray Delhi PC News: उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून, इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होणार आहेत.

“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Delhi PC News: प्रत्येक राज्याच्या निवडणुका त्यांच्या वेळेनुसार होणार आहेत. बिहारमध्ये जो मतदार याद्यांचा घोळ झाला आहे, स्वत:ची ओळख मतदारांनी पटवून द्यायची, त्याचा अर्थ देशात अघोषित NRC लागू झाले आहे का हा प्रश्न आहे. याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला हवे आहे. EVM मशिनवर आक्षेप असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT काढून टाकले आहे. मग मतदान घेता कशाला, तुम्ही किती जागा जिंकल्या हे जाहीर करून टाका. बॅलेट पेपरवर शिक्का मारल्यानंतर मत कुठे दिले हे कळत होते. आता व्हीव्हीपॅटही नाही मग निवडणूक घेण्याचा फार्स करता कशाला? अशी थेट विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या ५० टक्के टॅरिफपासून ते उपराष्ट्रपतींना द्याव्या लागलेल्या राजीनाम्यासह अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकार, भाजपा महायुतीवर जोरदार निशाणा साधला. तसेच मनसे युतीबाबतही भाष्य केले. उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला? तसेच राजीनामा दिल्यानंतर ते आहेत कुठे? यावर चर्चा झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प रोज खिल्ली उडवत आहेत, पण आपण एका शब्दाने उत्तर देत नाही
डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना अवाक्षरानेही उत्तर देत नाही. देशाचे सरकार नेमके कोण चालवत आहे? आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज आहे. आत्ताचे पंतप्रधान हे भाजपाचे आहेत. ते भाजपाचे प्रचारमंत्री आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर मोदी बिहारला गेले, पहलगामला गेले नाही. या सरकारकडे परराष्ट्र नीती, खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारत असताना अजित डोवाल रशियाला गेले. पंतप्रधान चीनला चालले आहेत. पण हे सगळे होत असले तरीही परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, राज ठाकरेंबाबत युतीवर दुसऱ्या कुणासोबत चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमची भूमिका घ्यायला सक्षम आहोत. आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही बंधू खंबीर आहोत. इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटीशर्ती ठरल्या नाहीत. आम्हाला काय करायचे त्यावर तिसऱ्याची गरज नाही असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.