नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आणि केलेल्या प्रत्येक कृतीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असते. दरम्यान, काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी नरेंद्र मोदींना सतत खलनायक ठरवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदींचा सातत्याने खलनायक असा उल्लेख करून विरोधक त्यांचीच मदत करत आहेत, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. तर जयराम रमेश यांनी काल असेच वक्तव्या करताना नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी व्हिलन ठरवून त्यांच्यावर टीका करत राहिल्याने काहीही हाती लागणार नाही, असा सल्ला रमेश यांनी दिला होता. जयराम रमेश यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत अभिषेक मनु सिंघवी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, मोदींना खलनायकाप्रमाणे सादर करणे हे चुकीचे आहे. ते पंतप्रधान आहेत म्हणून नव्हे तर असे करून विरोध त्यांचीच मदत करत आहेत. काम हे चांगले, वाईट किंवा सामान्य असू शकते. त्यामुळे कामाचे मूल्यांकन हे व्यक्ती नव्हे तर मुद्द्यांच्या आधारावर झाले पाहिजे. उज्ज्वला योजना ही चांगल्या कामांपैकी एक आहे.''
काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते म्हणतात, मोदींना सातत्याने खलनायक ठरवणे चुकीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:31 IST