केंद्रात शिवसेनेला हवीत आणखी दोन मंत्रिपदे
By Admin | Updated: December 15, 2014 04:01 IST2014-12-15T04:01:39+5:302014-12-15T04:01:39+5:30
मे २०१४ मध्ये मंत्रिपदाचा वादाचा ठरलेला मुद्दा नव्याने समोर आणल्यास रालोआमध्ये धुसफुशीला निमंत्रण देणे ठरेल, असा संदेशही भाजपने दिला आहे.

केंद्रात शिवसेनेला हवीत आणखी दोन मंत्रिपदे
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
शिवसेनेने केंद्रात आणखी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्याची मागणी केली असून संख्याबळानुसार ती अवास्तव ठरत असल्याचे सांगत भाजपश्रेष्ठींनी केवळ एक मंत्रिपदावर बोळवण करण्याचे संकेत दिले आहेत.
मे २०१४ मध्ये मंत्रिपदाचा वादाचा ठरलेला मुद्दा नव्याने समोर आणल्यास रालोआमध्ये धुसफुशीला निमंत्रण देणे ठरेल, असा संदेशही भाजपने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच याबाबत निर्णय घेतील, असेही सांगितले जात आहे. शिवसेनेकडे १८ खासदार असून केवळ १० खासदारांना एक एक कॅबिनेट खाते या फॉर्म्युल्यानुसार अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग हे कॅबिनेट खाते आहे. तेलगू देसमकडे १६ खासदार असतानाही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. ८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आणखी दोन मंत्रिपद देण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाला कळवावे, असा आग्रह धरला होता.
फडणवीसांनी त्यांना होकार दिला मात्र ठाकरेंनी थेट मोदी किंवा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलावे, असे त्यांना वाटते. दोन मित्रपक्षांमधील मतभेदांची दरी मिटवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. मोदी सरकारचा चांगल्या प्रशासनाचा अजेंडा राबवत महाराष्ट्राला उंचीवर नेले जावे, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.