श्रीनगरमध्ये चकमकीत एलईटीचा कमांडर सैफुल्लासह दोन अतिरेकी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 03:17 IST2020-10-13T03:16:53+5:302020-10-13T03:17:06+5:30
सोमवारी सकाळीच सुरक्षादलांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पावणेआठ वाजता अतिरेक्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार सुरू केला

श्रीनगरमध्ये चकमकीत एलईटीचा कमांडर सैफुल्लासह दोन अतिरेकी ठार
श्रीनगर : दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’चे दोन अतिरेकी सोमवारी येथील ओल्ड बारझुल्ला भागात सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. अनेक हल्ल्यांत सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाचा या दोघांत समावेश आहे.
सोमवारी सकाळीच सुरक्षादलांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पावणेआठ वाजता अतिरेक्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षादलांनी चोख प्रत्युत्तर दिले व त्यात दोन अतिरेकी मारले गेले.
अनेक हल्ल्यांत सहभाग
पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले की, या दोन अतिरेक्यांपैकी एक सैफुल्ला हा पाकिस्तानी व लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आहे. काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर नौगाम, चादुरा आणि कांडीझाला येथे नुकत्याच झालेल्या अनेक हल्ल्यांत सैफुल्लाचा सहभाग होता. यावर्षी श्रीनगर शहरात अतिरेक्यांशी आठ चकमकी झाल्या, त्यात १८ अतिरेकी मारले गेले. अतिरेक्यांविरोधात ७५ मोहिमा राबवल्या गेल्या, त्यात १८० अतिरेकी मारले.