सुरेश एस. डुग्गर
जम्मू : अमरनाथ यात्रेला ३ जुलै रोजी सुरुवात होणार असून, त्यासाठी पहिली तुकडी उद्या बुधवारी २ जुलै रोजी जम्मू येथून रवाना होईल. जर हवामानाने साथ दिली तर या तुकडीतील भाविक गुरुवारी १४,५०० फूट उंचीवरील अमरनाथ गुंफेत जाऊन दर्शन घेऊ शकतील. विविध दलाचे दोन लाख जवान या यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात आहेत.
पहलगाम, बालटाल मार्गाने दररोज १५ हजार भाविक अमरनाथ गुंफेसाठी रवाना होणार आहे. आतापर्यंत सव्वा तीन लाख यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. तसेच आता ऑन-द-स्पॉट नोंदणीही सुरू झाली आहे. या यात्रेची मुख्य छावणी जम्मूच्या यात्रेकरू भवनामध्ये आहे. तेथे अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली आहे.
१२५हून अधिक ठिकाणी लंगर, निवासव्यवस्था
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन व सुरक्षा दले सतर्क आहेत. यंदाच्या वर्षी या यात्रेला ८ ते १० लाख भाविक येण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी १२५हून अधिक लंगर व निवास व्यवस्थेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांत अमरनाथ यात्रेत हृदयविकाराच्या झटक्यामुळे दरवर्षी सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती लक्षात घेता यात्रेच्या मार्गात आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने ड्रोन आणि श्वान पथकही यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.