भारतमातेची सीमा अबाधित ठेवण्यासाठी सैन्यातील हजारो जवान भाऊ सीमेवर पहारा ठेवत आहेत. दहशतवादाविरोधात लढत आहेत. या जवानांना लाखो बहिणी आजच्या दिवशी राखी पाठवत असतात. या राख्या बांधून जवान भारावलेले असतात. याच रक्षाबंधनाच्या दिवशी जम्मू-कश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना दोन जवान भाऊ धारातीर्थी पडले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्याने मोठी मोहिम उघडली आहे. कुलगामच्या अलाख भागात दहशतवाद्यांशी चकमकीचा आज नववा दिवस आहे. रात्रभर या भागात गोळीबाराचा आवाज ऐकायला येत होता. या चकमकीत दोन जवान शहीद झाले तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. लान्स नाईक प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग हे शहीद झाले आहेत.
आतापर्यंत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. या जंगल भागात नैसर्गिक गुहांचा आधार घेत कमीतकमी तीन ते चार दहशतवादी लपलेले आहेत. गेल्या ९ दिवसांपासून हे दहशतवादी सैन्यावर गोळीबार करत आहेत. यावरून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा असल्याचे समोर येत आहे.