नवी दिल्ली : दिल्लीतील लक्झुरियस हॉटेल सूर्या आणि हॉटेल क्राऊन प्लाझा यांचा वापर विस्तारित कोविड-१९ रुग्णालये म्हणून करणे इष्ट आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने व्यवहार्य ठरेल, अशी माहिती डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीने दिल्ली उच्च न्यायालयाला दिली.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक रणदीप गुलेरिया आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांच्या दोन सदस्यीय समितीने न्यायमूर्ती नवीन चावला यांना याबाबत अहवाल सादर केला. चावला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे सुनावणी घेतली. ‘हॉटेल्सना भेट दिल्यानंतर हॉटेल सूर्या (न्यू फ्रेंडस कॉलनी) आणि हॉटेल क्राऊन प्लाझा यांचा वापर एनसीटी दिल्लीत विस्तारित कोविड रुग्णालय म्हणून करणे इष्ट आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने व्यवहार्य असल्याचे समितीचे मत बनले आहे,’ असे अहवालात म्हटले. हॉटेल सूर्यामध्ये तीन मोठे मेजवानी हॉल्स असून, तेथे सहजपणे ५०-६० खाटा लावता येतील व सेंट्रल लॉबीचा वापर मध्यवर्ती नर्सिंग स्टेशन म्हणून केला जाऊ शकतो, तसेच हॉटेल क्राऊन प्लाझाच्या मेजवानी हॉलमध्ये सुमारे २५ खाटा सहजपणे लावता येतील, असे समितीने अहवालात म्हटले.
दिल्लीतील दोन हॉटेल्स विस्तारित रुग्णालये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 03:07 IST