एका माथेफिरू तरुणाने आपल्या दोन मित्रांसह मंदिरातील एका पहारेकऱ्याची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक नायर या तरुणाला अटक केली आहे. दीपक याने एकाच दिवशी आपल्या दोन मित्रांसह मंदिरातील एखा पहारेकऱ्याची हत्या केली होती. माथेफिरू दीपक नायर हा पेशाने इंजिनियर असून, त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक बाब समोर आली आहे.
पोलीस तपास आणि आरोपींच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी दीपक याने अंद्धश्रद्धेतून दोन मित्र आणि मंदिरातील पहारेकऱ्याची हत्या केली. आपले मित्र असलेले संदीप आणि मोनू हे आपल्यावर काळी जादू करतात, अशा दीपक याला संशय होता. तसेच अय्यप्पा मंदिरातीली पुजारीही जादूटोणा करत असल्याचा आरोप त्याने केला होता.
+मिळालेल्या माहितीनुसार अय्यप्पा मंदिरातील पहारेकरी लालसिंह रावणा राजपूत याची मंदिरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचं गुप्तांग कापून टाकण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी दीपक नायर या तरुणाला अटक केली होती. अटकेनंतर अधिक तपासासाठी पोलीस जेव्हा त्याला घरी घेऊन गेले. तेव्हा तिथे त्याच्या दोन मित्रांचेही मृतदेह सापडले.
आता प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या मागे न्यू बापूनगर येथे राहणाऱ्या दीपक याला पोलिसांकडून सवाल विचारले जात आहेत. आतापर्यंतचा तपास आणि चौकशीमधून दीपक हा मुळचा केरळमधील रहिवासी असून, त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपी दीपक याने आयआयटीमधून शिक्षण घेतलं होतं. तसेच सध्या तो देशातील एका प्रतिष्ठित मोबाईल कंपनीमध्ये इंजिनिय म्हणून कार्यरत असल्याचेही समोर आले आहे.