पाकच्या गोळीबारात BSF चे दोन जवान जखमी
By Admin | Updated: August 11, 2014 10:48 IST2014-08-11T10:28:00+5:302014-08-11T10:48:24+5:30
पाकिस्तान सैन्याने जम्मू काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टर येथे रविवारी रात्री बेछूट गोळीबार केल्याने भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान जखमी झाले आहे.

पाकच्या गोळीबारात BSF चे दोन जवान जखमी
ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. ११ - पाकिस्तान सैन्याने जम्मू काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टर येथे रविवारी रात्री बेछूट गोळीबार केल्याने भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान जखमी झाले आहे. या घटनेत सीमा रेषेजवळील गावात राहणारे दोन नागरिकही जखमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सैन्याने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय चौक्यांवर गोळीबार सत्र सुरुच ठेवले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतासोबत चर्चेचे संकेत दिले असतानाच रविवारी पाक सैन्याने पुन्हा एकदा भारतीय जवानांवर गोळीबार सुरु केला. रविवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सीमा रेषेवरील बीएसएफ नाक्यावर पाक सैन्याने एक गोळी झाडली. यानंतर पुन्हा गोळीबार न झाल्याने बीएसएफच्या जवानांनी त्यावर प्रत्युत्तर दिले नाही. मात्र रात्री सव्वा नऊनंतर पाक सैन्याकडून सीमा रेषेवरील दहा भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. याला गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. रविवारी मध्यरात्रीपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास पाकिस्ताने अरनिया सेक्टर येथील भारतीय चौकीवरही गोळीबार केला व यात दोन भारतीय जवान जखमी झाले. तर या धुमश्चक्रीत सीमारेषेवरील गावांमधील घरांचे किरकोळ नुकसान झाले. यात दोन नागरिक किरकोळ जखमी झाले. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु असून जखमी नागरिकांना उपचारानंतर घरीदेखील सोडण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गोळीबार सुरु ठेवल्याने सीमा रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. रात्रभर गोळीबाराच्या आवाजाने जीव मुठीत धरुन बसलो होतो अशी प्रतिक्रिया सीमा रेषेवरील गावात राहणा-या महिलेने दिली. काँग्रेसनेही पाकविरोधात मोदी सरकार नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे.