बारा दिवसांत चित्र पालटले

By Admin | Updated: February 11, 2015 02:29 IST2015-02-11T02:29:00+5:302015-02-11T02:29:00+5:30

दिल्ली में फ्री वाय-फाय देंगे..’ निवडणुकीचा जराही मागमूस नसताना राजधानीतील मेट्रोमधील प्रत्येक डब्यात दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या या पोस्टरने

In twelve days the picture changed | बारा दिवसांत चित्र पालटले

बारा दिवसांत चित्र पालटले

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
‘दिल्ली में फ्री वाय-फाय देंगे..’ निवडणुकीचा जराही मागमूस नसताना राजधानीतील मेट्रोमधील प्रत्येक डब्यात दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या या पोस्टरने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. तरुणांना भुरळ पडली. निवडणुका दिसू लागल्या तसे.. तसे वीज, पाणी वाहतुकीवर लक्ष वेधण्यात आले. जुन्या दिल्लीत पोस्टरयुद्ध सुरू झाले. एक दिवस दाढीची खुंटं, डोक्यावर मफलर असी सामान्य छबीचे केजरीवालांचे ‘पाच साल केजरीवाल..’ हे पोस्टर चमकले.. आणि तेच साऱ्यांच्या डोक्यात भिनले.
यानंतर ‘चलो चले मोदी कें साथ..’ अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर किरण बेदी व मोदी यांची छबी असलेली पोस्टरबाजी झाली. पण ‘पाच साल केजरीवाल..’ या पोस्टरचे गारूड कायम राहिले. घराणे राजकारणाचे नाही, ग्लॅमरचाही मागमूस नाही, प्रभावी पद नाही की पदाधिकारी नाही.. पण अरविंद केजरीवालांच्या नावावर लोक जमू लागले. दिल्लीच्या प्रचारातील १२ दिवसांत रोज वाढणारा हाच नजारा. जाहीर सभा, कॉर्नर सभा, घरातील बैठका असोत वा मोटार रॅली.. साऱ्याच ठिकाणी असेच चित्र.
एक तारखेनंतर प्रचाराचा जोर चढत होता. त्याच दिवशी केजरीवाल म्हणाले, गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला ४९ दिवसांचे मुख्यमंत्रिपद आपण सोडले. यंदाच्या १४ फेब्रुवारीला आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहोत. भाजपावाल्यांनी त्यांच्या या विधानाची खिल्ली, ‘कन्फुज्ड नेते, डिफ्युज्ड पार्टी..’ अशा शब्दांत उडवली.. पण लोकांच्या मनाचा पूर्ण ताबा केजरीवाल यांनी मिळवला होता. कृष्णानगर किरण बेदी यांचा तर नवी दिल्ली केजरीवाल यांचा मतदारसंघ. बेदी आयात झाल्या आणि आयत्याच पोळीवर तूप घेऊ लागल्या. कृष्णानगर परंपरागत भाजपाचा मतदारसंघ. संघांचा बालेकिल्ला असलेला हा टापू. आताचे केंद्रीय मंत्री व मागच्या विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन येथून पाचवेळा विजयी झाले. त्यांचा या ठिकाणी दवाखाना आहे. ते रोज न चुकता सकाळी ८ वाजता येतात. तासभर बसतात. हर्षवर्धन हे मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. अशा सुरक्षित ठिकाणी दुसरीकडे राहणाऱ्या बेदींना भाजपाने उभे केले होते. मोठी फौज प्रचाराला होती. त्यांच्या पुढ्यात काँग्रेसचा उमेदवार फिका होता. पण आपच्या उमेदवाराचे नाव साऱ्यांच्याच तोंडी होते. प्रचाराच्या समारोपाला या भागात कधीच रॅली निघाली नव्हती. यंदा निघाली. हर्षवर्धन, खा. महेश गिरी व बेदी मोटारीवर होत्या. पुढेमागे फारतर शंभर लोक असतील. आपची रॅली निघाली. दोन हजारांवर लोक होते. पण तरीही बेदी विजयी होतील, अशा फुशारक्या मारल्या जात होत्या. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल गेल्या वेळीही विजयी झाले होते. प्रचारातील एक प्रसंग मोठा चमत्कारिक होता.
४ फेब्रुवारीला ज्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांची सभा व्हायची त्या उत्तमनगर- माधोपूरच्या २४ फुटी रस्त्यावर केजरीवाल यांची सभा होती. भर दुपारी ३ वाजता १० हजारांवर लोक होते. मंच सोडला तर कुठेच एक खूर्ची दिसत नव्हती. गर्दीने रस्ता फुलून गेला होता. घोषणांनी वातावरण धुंद होते. केजरीवाल तिथे आलेच नाहीत. त्याचबाजूच्या एका रस्त्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची सभा होती. तिथे खुर्च्या होत्या. त्यातील निम्म्या रिकाम्या होत्या. फारतर शंभर-दीडशे लोक असतील.. तरी भाजपावाले गुर्मीत होते. हा इलाका संमिश्र व गल्लींचा आहे. तेथे गल्लीच्या प्रवेशावरच एक पोस्टर होते. ‘पीएम मोदी, सीएम केजरी..’ सभा आटोपल्यावर खट्टर यांनीही त्याकडे पाहिले आणि पुढे निघाले.
भाजपाच्या जाहिरातीत केजरीवालांचा ‘उपद्रवी गोत्र’असा उल्लेख झाला आणि
त्यांच्या प्रचाराचे सूत्रच बदलले. निवडणुकीला तेथून जोर चढला.

Web Title: In twelve days the picture changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.