Trump’s tariff on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणतात की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून एकमेकांची स्तुती केल्याचा काही फायदा नाही. पंतप्रधानांनी स्पष्ट करावे की, ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय का घेतला? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
व्हाईट हाऊसमध्ये मीडियाशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "आम्ही सध्या भारतासोबत चर्चा करत आहोत, यामध्ये ब्रिक्सचा मुद्दा देखील सामील आहे. तुम्हाला माहिती आहे, ब्रिक्स हा अमेरिका विरोधी देशांचा गट आहे आणि भारत त्याचा सदस्य आहे. हा अमेरिकन चलनावर हल्ला आहे, आम्ही हे होऊ देणार नाही." दरम्यान, ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांनी रशियन कच्चे तेल आणि लष्करी उपकरणांच्या खरेदीवरही दंड लावला आहे.
जयराम रमेश मोदी सरकारवर संतापलेभारतावर भारी कर लादल्याबद्दल विरोधक संतापले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, "ट्रम्प यांनी भारतीय मालावर २५ टक्के कर लादला आहे. मोदी-ट्रम्प एकमेकांची स्तुती करत राहिले, पण या कौतुकाला आता काही अर्थ उरला नाही. पंतप्रधान मोदींना वाटले की, जर ते अमेरिकल राष्ट्राध्यक्षांनी भारतासाठी वापरलेल्या अपमानास्पद शब्दांवर गप्प राहिले, तर भारताला विशेष दर्जा मिळेल. पण तसे झाले नाही."
"ट्रम्प यांनी ३० वेळा ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचे दावे केले, त्यानंतर त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. अमेरिकेने पाकिस्तानला आयएमएफ आणि जागतिक बँकेकडून आर्थिक पॅकेजसाठी पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींपासून प्रेरणा घ्यावी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसमोर उभे राहावे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
तर, दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, "पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना खूश करण्याचा प्रयत्न करून "गंभीर चूक" केली. आता अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर लादल्यानंतर पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्याविरुद्ध उभे राहून धाडस दाखवतील का?" मोदी सरकारवर निशाणा साधताना पवान खेरा म्हणतात, "कालपर्यंत आम्हाला आशा होती की, पंतप्रधान काही धाडस दाखवतील आणि ट्रम्प खोटं बोलत असल्याचे जाहीर करतील. आम्हाला वाटले की, कदाचित ते व्यापार कराराला घाबरून शांत आहेत, मात्र आता व्यापार करारही उघड झाला आहे. हे कोणत्या प्रकारचे परराष्ट्र धोरण आहे?" असा सवाल त्यांनी केला.