एका रात्रीत नशीब पालटलं! ट्रक ड्रायव्हरनं जिंकली १० कोटींची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:18 IST2025-01-22T12:13:58+5:302025-01-22T12:18:01+5:30
Punjab 10 Crore Lottery Winner : कुवेतमध्ये ट्राक ड्रायव्हर म्हणून काम करणारे हरपिंदर सिंग यांनी रविवारी १० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.

एका रात्रीत नशीब पालटलं! ट्रक ड्रायव्हरनं जिंकली १० कोटींची लॉटरी
Punjab 10 Crore Lottery Winner : कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार पंजाबमधील हरपिंदर सिंग यांच्या बाबतीत घडला आहे. हरपिंदर सिंग यांचे नशीब एका रात्रीत पालटले आहे. मुळचे पंजाबमधील रोपार येथील बारवा गावातील रहिवासी आणि कुवेतमध्ये ट्राक ड्रायव्हर म्हणून काम करणारे हरपिंदर सिंग यांनी रविवारी १० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.
आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावी परतलेल्या हरपिंदर सिंग यांनी पंजाबमधील रोपार जिल्ह्यातील नुरपूर बेदी शहरातील अशोका लॉटरीमधून तिकीट खरेदी केले होते आणि ते विजेता ठरले. याबाबत हरपिंदर सिंग म्हणाले की, "मी नियमितपणे लॉटरीची तिकिटे खरेदी करायचो. यावेळी, मी लोहरी मकर संक्रांतीचे बंपर तिकीट खरेदी केले. त्यानंतर मला अशोका लॉटरीचा फोन आला की, मी लॉटरी जिंकलो आहे."
राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी १० कोटी रुपयांची लॉटरी हरपिंदर सिंग यांनी जिंकली. अशोका लॉटरीचे मालक हेमंत कक्कर यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, आपल्या एका खरेदीदाराने बक्षीस जिंकले याचा मला आनंद आहे. तर हरपिंदर सिंग यांनी लॉटरी जिंकल्यानंतर आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केल्याचे आणि बराच काळ ट्रक चालवत असल्याचे सांगत गरजूंना मदत करण्याचा आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्लॅन करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे.
बक्षीस जिंकल्यानंतर हरपिंदर सिंग यांनी सांगितले की, "मला कर्ज फेडायचे आहे. मात्र, सुरूवातीला मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. मी कुवेतला जाण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. तसेच, माझा मुलगा देविंदर सिंग याला काही वर्षांपूर्वी एका अपघातात डावा हात गमवावा लागला. हा आमच्या सर्वांसाठी खूप मोठा धक्का होता. आता मला आशा आहे की, मी त्याला चांगले उपचार मिळवून देऊ शकेन आणि त्याच्याकडे उत्पन्नाचे एक स्थिर स्रोत असेल, याची खात्री करू शकेन."
सब-स्टॉकिस्टला ५ लाख रुपये मिळतील
पंजाब राज्य लॉटरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, बक्षिसाच्या रकमेपैकी ३० टक्के रक्कम मूळ रकमेवर कर म्हणून कापली जाईल. अतिरिक्त आयकर देणी देखील असतील. या विजयामुळे विक्रेता हेमंत कक्कर यांनाही मोठा फायदा झाला आहे, ज्यांना जवळपास २५ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर सब-स्टॉकिस्टला ५ लाख रुपये मिळतील. याशिवाय, अधिकाऱ्यांच्या मते, विक्रेता हेमंत कक्कर यांची "विश्वसनीय" तिकीट विक्रेता म्हणून ओळख देखील मजबूत झाली आहे.