Rajasthan Crime:राजस्थानात एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षांपासून एकाच कंपनीत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वतःला संपवले. पीडित व्यक्तीने आत्महत्येपूर्वी दोन पानी पत्र लिहीले होते. यामध्ये कर्मचाऱ्याने वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्मचाऱ्याने पत्रामध्ये आई वडिलांचाही उल्लेख केला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा आता तपास करत आहेत.
राजस्थानच्या जयपूरमध्ये ऑफिसमधील बॉसच्या छळाला कंटाळून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्या तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये वेदनादायक खुलासे केले आहेत. मृताच्या कुटुंबाला उशीखाली त्याची सुसाईड नोट सापडली. मुकेश कुमार जांगिड असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत मुकेशने त्यांच्या कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकारी दिलीप सिंह चौहान आणि राजेश अरोरा यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
मुकेश हा विद्याधर नगर येथील सेंट्रल स्पाइन येथील एका कंपनीत सुमारे १५ वर्षांपासून काम करत होता. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर, कुटुंबातील सर्वजण झोपायला गेले. रात्री १२:१५ च्या सुमारास मुकेशने विष प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा कुटुंबियांनी त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला एसएमएस रुग्णालयात हलवण्यात आले. पण वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. झोटवाडा मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबीयांना सोपवला. मृताचा भाऊ लोकेश कुमार यांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"बाबा, मी शक्य तितका वेळ लढलो. पण आता, मी हरलो आहे. बॉस दिलीप सिंग आणि राजेश अरोरा यांनी मला इतका मानसिक त्रास दिला की माझ्यात जगण्याची हिंमत राहिली नाही. मला खोट्या कागदपत्रांवर सही करायला लावण्यात आली आणि आता ते मला पोलिस प्रकरणात अडकवण्याची धमकी देत आहेत. मला तुरुंगात जायचे नाहीये. मला दररोज मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे, असं मुकेशने आपल्या पत्रात म्हटले.
सुसाईड नोटमध्ये मुकेशने पत्नी रेखा, भाऊ बबलू आणि लोकेश यांची माफी मागितली. रेखा, मी तुला रस्त्याच्या मधोमध सोडून जात आहे, कृपया मला यासाठी माफ करा. लोकेश, आई बाबांची काळजी घे, असेही मुकेशने म्हटलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश ८ एप्रिलपासून ऑफिसला गेला नव्हता आणि तो तणावाखाली होता.