VIDEO: चल बाहेर निघ! लग्न लागत असताना पोलीस आले मंडपात; धक्के मारत काढली नवरदेवाची 'वरात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 12:35 IST2021-04-28T12:35:20+5:302021-04-28T12:35:50+5:30
जिल्हाधिकारी शैलेश कुमार यांच्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO: चल बाहेर निघ! लग्न लागत असताना पोलीस आले मंडपात; धक्के मारत काढली नवरदेवाची 'वरात'
अगरताळा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणं गरजेचं आहे. मात्र तरीही अनेक जण नियम मोडत आहेत. नियम धाब्यावर बसवून करण्यात येणाऱ्या एका लग्न सोहळ्यातील कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं त्रिपुरामध्ये सध्या नाईट कर्फ्यू लागू आहे. मात्र तरीही पश्चिम त्रिपुरा येथे एका ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विवाह सोहळा सुरू होता. त्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी कारवाई केली. त्यावेळी त्यांनी अनेकांना हॉलबाहेर जाण्यास सांगितलं. तर नवरदेवाला थेट धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. संतापलेल्या शैलेश कुमार यांनी हॉल सील करण्याचे आदेश दिले.
No DM Sahab. This is not done. Sorry!! pic.twitter.com/yRAYppzWdI
— Awanish Sharan (@AwanishSharan) April 27, 2021
व्हायरल व्हिडीओमध्ये शैलेश कुमार एका हॉलमध्ये जाऊन लग्न सोहळा थांबवताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी उपस्थितांना कठोर शब्दांत सुनावलं. यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवर आता टीका होऊ लागली आहे. शैलेश यांनी नवरदेवाला धक्के मारून बाहेर काढलं. या प्रकरणी आपत्ती प्रतिबंधात्मक अधिनियमांच्या अंतर्गत अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी ३० जणांना अटक केली. मात्र थोड्याच वेळात त्यांची सुटका झाली.