शारदा चिट फंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याला अटक, ममता बॅनर्जींना झटका

By Admin | Updated: December 12, 2014 17:07 IST2014-12-12T16:52:16+5:302014-12-12T17:07:53+5:30

तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे

Trinamool Congress minister sticks to Sharda chit fund scam, Mamata Banerjee jolts | शारदा चिट फंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याला अटक, ममता बॅनर्जींना झटका

शारदा चिट फंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याला अटक, ममता बॅनर्जींना झटका

>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १२ - तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. यामुळे शारदा घोटाळ्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चांगलाच धक्का बसला आहे. केंद्रातील भाजपा सरकार येत्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सीबीआयमार्फत आकसाने कारवाई करत असल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. तर कम्युनिस्ट पार्टीच्या गुरुदास दासगुप्ता यांनी यात भाजपाचा काहीही संबंध नसून तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते या घोटाळ्याशी संबंधित असल्याचा आरोप केला.
भाजपाचे नेते सिद्धार्थ नाथ सिंग यांनीही आपण पहिल्यापासून तृणमूलच्या नेत्यांचा शारदा चिट फंड घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्याचे सांगितले. शारदा समूहाचे प्रमुख सुदिप्तो सेन यांच्याकडून मित्रा यांनी आर्थिक सहाय्य घेतल्याचा आरोप असून तृणमूलच्या किती नेत्यांचा यात सहभाग आहे याबद्दलही चौकशी करण्यात येत आहे. शारदा घोटाळ्यातील पैशांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर झाल्याचे तपासात समोर आल्यानंतर या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने घेण्यात आले आणि सीबीआयने तपासाला गती दिली.
याआधीही सीबीआयने मित्रा यांची चौकशी केली होती. शारदा समूहाचे पैसे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात आले होते आणि याबाबत मित्रा हे त्यांची बाजू नीट मांडू शकले नव्हते. शारदा समूहाचे पैसे मित्रा यांच्याखेरीज तृणमूलच्या अन्य नेत्यांकडेही पोचल्याचे तपासात आढळले होते. मित्रा यांनी अनेक आठवडे सीबीआयचा ससेमिरा चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर सीबीआयने आपला पाश आवळला आणि मित्रा यांना अटक केली आहे.

Web Title: Trinamool Congress minister sticks to Sharda chit fund scam, Mamata Banerjee jolts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.