संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 05:27 IST2025-12-14T05:26:24+5:302025-12-14T05:27:04+5:30
स्मृतिदिनानिमित्त १३ डिसेंबर रोजी जुन्या संसद भवनाबाहेर दरवर्षीय विशेष समारंभाचे आयोजन केले जाते.

संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
नवी दिल्ली : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना या हल्ल्याच्या २४व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती राधाकृष्णन, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक खासदारांनी श्रद्धांजली अर्पण केली.
स्मृतिदिनानिमित्त १३ डिसेंबर रोजी जुन्या संसद भवनाबाहेर दरवर्षीय विशेष समारंभाचे आयोजन केले जाते. दरम्यान, या समारंभात औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी या शहिदांना सलामी दिली.
९ जणांचा झाला होता मृत्यू
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांनी संसद संकुलावर हल्ला केला होता. यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या सुरक्षा ताफ्यातील पाच पोलिस, संसदेच्या सुरक्षा सेवेतले दोन कर्मचारी, बागकाम करणारा कर्मचारी, टीव्ही पत्रकार यांचा मृतांत समावेश होता. सुरक्षा दलाच्या कारवाईत पाचही दहशतवादी मारले गेले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही शहीदांना पुष्पांजली अर्पण केली.