Kathua Rape Case : कठुआ सामूहिक बलात्कार-हत्याप्रकरणी आजपासून सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 09:31 IST2018-04-16T07:50:49+5:302018-04-16T09:31:31+5:30
जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी आजपासून स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Kathua Rape Case : कठुआ सामूहिक बलात्कार-हत्याप्रकरणी आजपासून सुनावणी
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी आजपासून स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर करुन सुनावणीला सुरुवात होणार आहे. कठुआ येथील एका 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत असल्याचे वृत्त आहे. पीडितेच्या बाजूनं केस लढणाऱ्या दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यात व्हावी अशी याचिका ते सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.
एका बालिकेचे आठ वर्षे वयाच्या १० जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अत्याचारानंतर असिफाची हत्या केली. 17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली.
आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरूद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत.
या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाली आहे, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू आहेत.