दोन वर्षांनी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. एकीकडे विरोधक मोर्चेबांधणी करत असताना दुसरीकडे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपाच्या १०० ते ११५ आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. जे आमदार गेल्यावेळी भाजपाच्या जिवावर निवडून आले आणि आताही तेच करायच्या तयारीत असलेल्या या आमदारांचा नंबर यात आहे.
महत्वाचे म्हणजे हा आकडा भाजपाच्या निम्म्या आमदारांएवढा आहे. या आमदारांच्या जागी भाजपा दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे भाजपाच नाही तर सपाच्या भाजपमध्ये येऊ इच्छुक असलेल्या आमदारांसमोरही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या आमदारांसोबतच सपाच्या आमदारांनाही भाजपात जाताना किंवा गेल्यावर अंतर्गत सर्वेक्षण चाचणी पास करावी लागणार आहे. भाजपाला विजयाची हॅटट्रीक करायची आहे. तर सपा भाजपाविरोधात पीडीएचा मुद्दा उचलत आहे. यामुळे भाजपाने अंतर्गत हालचाली सुरु केल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
भाजपा लवकरच अंतर्गत सर्व्हे करण्याची तयारी करू शकते. प्रत्येक विधानसभा जागेवर भाजपा आपल्या आमदारांचा खरा चेहरा तपासणार आहे. याचसोबत सपाच्या ताब्यात असलेल्या जागांवरही तपासणी केली जाणार आहे. लोकसभेला भाजपाला मोठा फटका बसला होता, यामुळे विधानसभेला भाजपा ताकद नसलेल्या आमदारांना बाजुला करण्याची रणनिती आखत आहे. यामुळे घराणेशाहीला देखील बगल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.