महाराष्ट्रातील १०१ वस्तूंचा खजिना ई-लिलावासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १,३०० स्मृतिचिन्हे भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 08:54 IST2025-09-20T08:38:51+5:302025-09-20T08:54:37+5:30
भारताचा सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा जतन करण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या दुर्मीळ कलाकृती मिळवण्याची ई-लिलावाद्वारे संधी नागरिकांना मिळाली आहे.

महाराष्ट्रातील १०१ वस्तूंचा खजिना ई-लिलावासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १,३०० स्मृतिचिन्हे भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आलेल्या वस्तूंचा सध्या ई-लिलाव करण्यात येत असून, त्यातील १,३०० स्मृतिचिन्हांपैकी १०१ वस्तू महाराष्ट्राच्या आहेत आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या वस्तू महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि कलात्मक वारशाचे दर्शन घडवताहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने राष्ट्रीय आधुनिक कला दालन, नवी दिल्लीकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ई-लिलाव करण्यात येत आहे.
पंतप्रधानांना देश-विदेशात मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव करण्यासाठी २०१९ पासून यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांना या अनोख्या भेटवस्तू खरेदी करून संग्रही ठेवण्याची संधी दिली जाते. यापूर्वीच्या लिलावातून ५० कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा झालेली आहे.
भारताचा सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा जतन करण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या दुर्मीळ कलाकृती मिळवण्याची ई-लिलावाद्वारे संधी नागरिकांना मिळाली आहे.
अशा आहेत महाराष्ट्रातील काही भेटवस्तू
हस्तनिर्मित देवी कोराडी मातेची मूर्ती : नागपूरजवळील या देवतेचे लाकडी शिल्प आहे. हे स्थानिक कलाकारांची कलात्मकता आणि राज्यातील आध्यात्मिक परंपरा दर्शवते.
वारली कला असलेले तारपा वाद्य : वारली आकृतिबंध असलेले बांबूपासून बनवलेले तारपा वाद्य. महाराष्ट्राची आदिवासी कला, सौहार्द आणि कथाकथनाच्या वारशाचे प्रतीक आहे.
नाशिकच्या श्री काळाराम मंदिरातील चांदीचा दरबार : एका सुशोभित तोरणाखाली भगवान श्रीराम, देवी सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची चांदीची विविध बारकाव्यांसह कलाकृती. भक्ती आणि कारागिरीचे मनोहारी दर्शन यात घडवले आहे.