रेल्वे दररोज बनविते १० हजार प्रवाशांचे जेवण

By Admin | Updated: July 4, 2015 03:48 IST2015-07-04T03:48:47+5:302015-07-04T03:48:47+5:30

८० सेकंदांपेक्षा कमी वेळात एकसारख्या गोल चपात्या बनविणारे भलेमोठे रोटी मेकर, टनांचा भात शिजवणारी स्टिम किटली आणि उण्यापुऱ्या तासाभरात तब्बल ४०० किलो

The train prepares every day for a meal of 10 thousand passengers | रेल्वे दररोज बनविते १० हजार प्रवाशांचे जेवण

रेल्वे दररोज बनविते १० हजार प्रवाशांचे जेवण

नवी दिल्ली : ८० सेकंदांपेक्षा कमी वेळात एकसारख्या गोल चपात्या बनविणारे भलेमोठे रोटी मेकर, टनांचा भात शिजवणारी स्टिम किटली आणि उण्यापुऱ्या तासाभरात तब्बल ४०० किलो भाजीपाला चिरणारे कटिंग मशिन, असा भारतीय रेल्वेच्या विशाल स्वयंपाकघराचा अफलातून ‘थाटबाट’ आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चालणाऱ्या या ‘सेन्ट्रल किचन’मध्ये दररोज हजारोंसाठी जेवण तयार केले जाते. स्वच्छ, आरोग्यदायी, तुलनेने स्वस्त आणि रुचकर जेवण हे या किचनचे वैशिष्ट्य बनले आहे. केवळ रेल्वे प्रवासीच नाही तर कॉर्पोरेट कंपन्यांमधील अनेकांची किचनच्या माध्यमातून क्षुधा भागवली जात आहे.
भारत आणि विदेशात तयार झालेल्या अत्याधुनिक स्वयंचलित उपकरणांद्वारे या फूड फॅक्टरीचे काम चालते. दी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)ेचे सहायक महाव्यवस्थापक सुधीर वॉरिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाकासाठी लागणारा कच्चा माल तळमजल्यावरील स्टोअर रूममध्ये ठेवला जातो. यात डाळी, तांदूळ, मसाले, शेवया आदींचा समावेश आहे. सुनियोजित पद्धतीचे लेबल लावून या मालाची साठवणूक केली जाते. नाशवंत पदार्थ दररोज सकाळी या ठिकाणी येतात. भाजीपाल, फळे वरच्या माळ्यावर कापली जातात. तत्पूर्वी ते धुणे आणि निर्जंतूक करण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी क्लोरिन टॅबलेट्सचा वापर केला जातो.
या स्वयंपाकघरात अलीकडे सांडपाणी प्रक्रिया संयत्र लावण्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शौचालय आणि फरशीच्या स्वच्छतेसाठी वापरण्याचा इरादा आहे. या कंपनीतील भल्यामोठ्या उपकरणांपैकी तूर्तास भाजीपाल कापण्याची स्वीडनच्या हाल्दे कंपनीचे उपकरण तूर्तास आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. एका तासात याद्वारे सुमारे ४०० किलो भाजीपाला चिरला जाऊ शकतो. इडली आणि वडा यासारख्या दक्षिण भारतीय व्यंजनांसाठी बटाटे सोलण्याचे आणि वड्यांसाठी लागणारे मिश्रण तयार करण्याचे मशिनही येथे आहे. या ठिकाणी देशविदेशातून उपकरणे मागवण्यात आली आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The train prepares every day for a meal of 10 thousand passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.