तेलंगणात एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:37 IST2019-10-09T00:37:16+5:302019-10-09T00:37:29+5:30
संप सुरू असला तरी ११ हजार बस चालविण्यात येत आहेत, असा दावा परिवहन मंडळाने केला होता.

तेलंगणात एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल
हैदराबाद : विविध मागण्यांसाठी तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा मंगळवारी चौथा दिवस होता. नेमका त्या दिवशी दसरा असल्याने लोकांची नातेवाईक वा अन्य ठिकाणी जाण्याची लगबग होती. बससेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे परिवहन मंडळाने म्हटले असले तरी प्रत्यक्षात तसे चित्र नसल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच राहिले.
संप सुरू असला तरी ११ हजार बस चालविण्यात येत आहेत, असा दावा परिवहन मंडळाने केला होता. तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या विविध कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण करावे ही संपकऱ्यांची मागणी मान्य करण्यास मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ठाम नकार दिला आहे. परिवहन सेवेमध्ये अडथळे निर्माण करणाºया, तसेच बस डेपोंची नासधूस करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचाºयांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश राव यांनी पोलिसांना दिले. (वृत्तसंस्था)