26 ला व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद, जीएसटीतील त्रुटींचा जाच; ४० हजार संघटना आल्या एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:54 IST2021-02-13T05:11:52+5:302021-02-13T07:54:27+5:30
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी महासंघाने ‘बंद’ची हाक दिली आहे.

26 ला व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद, जीएसटीतील त्रुटींचा जाच; ४० हजार संघटना आल्या एकत्र
मुंबई : जीएसटी करपद्धतीतील तरतुदींमुळे होणाऱ्या जाचाच्या विरोधात देशभरातील सर्व व्यापारी २६ फेब्रुवारी रोजी आपला व्यवसाय बंद ठेवणार असून, त्यासाठी त्यांच्या ४० हजार संघटना एकत्र आल्या आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी महासंघाने ‘बंद’ची हाक दिली आहे.
हा बंद यशस्वी व्हावा, यासाठी आमचे पदाधिकारी देशातील प्रत्येक राज्याचा दौरा करीत असून, तेथील व्यापारी व संघटना यांच्या भेटी घेत आहेत, असे ‘कॅट’चे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, या बंदमध्ये व्यापाऱ्यांबरोबरच महिला उद्योजक, कर सल्लागार, लघुउद्योग, कंपनी सेक्रेटरी, पेट्रोल पंपधारक, चित्रपट उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, मोबाइल उद्योग यांतील लोकांनीही सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.
याशिवाय ऑनलाइन व्यवसायातील विक्रेते, व्यापारी व संबंधित संघटना यांनाही या बंदमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे खंडेलवाल म्हणाले. आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यापार बंद यशस्वी व्हावा, यासाठी आताच दौरे सुरू केले असून, १४ ते २३ फेब्रुवारी या काळात प्रत्येक राज्यात, शहरात संघटना व व्यापाऱ्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यातही तयारी सुरू
जीएसटीमधील अनेक तरतुदी जाचक असून, त्यांकडे आम्ही वेळोवेळी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्यातील संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातही हा बंद यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला.