विषारी कोल्डरिफ सिरप प्रकरण; औषध कंपनी केली बंद, परवानाही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:52 IST2025-10-14T14:51:49+5:302025-10-14T14:52:09+5:30
तामिळनाडू सरकारची कारवाई; ईडीचेही छापासत्र

विषारी कोल्डरिफ सिरप प्रकरण; औषध कंपनी केली बंद, परवानाही रद्द
चेन्नई : खोकल्यावरील ‘कोल्डरिफ’ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) सोमवारी स्रेसन फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीशी संबंधित ठिकाणांवर तसेच तामिळनाडू अन्न व औषध प्रशासनाच्या (टीएनएफडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छापे टाकले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. २२ मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोल्डरिफ या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूतील स्रेसन फार्मास्युटिकल्स या कंपनीचा उत्पादन परवाना राज्य सरकारने रद्द केला आहे. तसेच ही कंपनी त्वरित बंद करण्याचे आदेश दिले.
ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत चेन्नईतील किमान सात ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये स्रेसन फार्मास्युटिकल्सच्या प्रमुख कर्मचाऱ्यांचे कार्यालय व निवासस्थान, टीएनएफडीएचे तत्कालीन प्रभारी संचालक पी. यू. कार्तिकेयन यांच्याशी संंबंधित ठिकाणाचा समावेश आहे. कार्तिकेयन यांना जुलै महिन्यात लाच प्रकरणात तामिळनाडू दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने अटक केली होती. ईडीच्या सूत्रांनी सांगितले, विषारी कोल्डरिफ सिरपच्या विक्रीमधून मिळवलेला नफा हा गुन्हेगारी पद्धतीने मिळविलेले उत्पन्न आहे.
कंपनीविरोधात कारवाई
२२ मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोल्डरिफ या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूतील स्रेसन फार्मास्युटिकल्स या कंपनीचा उत्पादन परवाना राज्य सरकारने रद्द केला आहे. तसेच ही कंपनी त्वरित बंद करण्याचे आदेश दिले.
ही माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. राज्य औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत, या सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल या विषारी रसायनाचे ४८.६ टक्के प्रमाण आढळले.
तपास यंत्रणांकडून ठोस पुरावे गोळा करणे सुरू
याबाबत या तपास यंत्रणेकडून ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशात नोंदविलेला पोलिस एफआयआर आणि तामिळनाडूतील लाच प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आधारे ईडीने ही छापे घालण्याची कारवाई केली. कोल्डरिफ सिरप घेतल्याने प्रदेशात २२ मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.