US Detention Camp: अमेरिकेतून हद्दपार केलेल्या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची कारवाई सध्या सुरु आहे. बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसलेल्यांना अमेरिकन लष्कराची विमाने त्यांच्यात देशात आणून सोडत आहेत. आतापर्यंत तीन विमानांमधून शेकडो भारतीयांना परत पाठवण्यात आलं आहे. रविवारी आता हद्दपार केलेल्या भारतीयांचा तिसरा गट देशात परतला. मात्र आता या प्रवासात भारतीयांसोबत गैरवर्तणूक होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हद्दपार केलेल्या भारतीयांच्या हाता पायात बेड्या घालण्यात आल्यावरुन मोठा वाद उफाळून आला होता. आता अमेरिकतेल्या डिटेंशन सेंटरमध्ये शीख तरुणांसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
रविवारी रात्री अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये अनेक शीख तरुणांचाही समावेश होता. यामध्ये एका शीख तरुणाचा फोटोही व्हायरल होत आहे, जो पगडी न घालता आणि विस्कटलेल्या केसांसह विमानतळावरून बाहेर पडत होता. मनदीप सिंग असे या तरुणाचे नाव आहे. मनदीप सिंग यांनी सांगितले की, अमेरिकन सैनिकांनी त्यांना पगडी घालण्याची परवानगी दिली नाही. जेव्हा त्यानी पगडी घालण्याबद्दल म्हटलं तेव्हा अमेरिकन सैनिकांनी त्याची पगडी पकडून कचऱ्याच्या डब्यात फेकली आणि त्याचे केसही जबरदस्तीने कापले.
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर अमेरिकेला गेलेल्या मनदीप सिंगने अमेरिकीत त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. "मी भारतीय लष्करात होतो. १७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती घेतली. घरी काम मिळत नसल्याचे मी परदेशात जाऊन आपलं आयुष्य चांगलं करायचं ठरवलं. यासाठी ट्रॅव्हल एजंटशी बोललो. त्यासाठी ४० लाख रुपये लागतील असे एजंटने सांगितले. मला सैन्यातून निवृत्तीनंतर ३५ लाख रुपये मिळाले होते. मी ते एजंटला दिले. बाकीचे ५ लाख रुपयांची व्यवस्था करण्यासाठी पत्नीचे दागिने विकले. यानंतर एजंटने आणखी १४ लाख रुपये देण्यास सांगितले. माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर एजंटने मला अमेरिकेत पाठवण्यास नकार दिला. यानंतर मी एजंटला कोरा चेक दिला त्यामुळे माझ्यावर १४ लाखांचे कर्ज झालं," असं मनदीपने सांगितले.
"७० दिवसांनी मेक्सिकोची भिंत ओलांडून अमेरिकेत प्रवेश करताच तेथील लष्कराने मला पकडले. त्यांनी सगळे कपडे काढायला सांगितले. एक शीख असल्याने मी त्याला पगडीचे धार्मिक महत्त्व समजावून ती काढू नका असं सांगितले. पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि माझी पगडी काढून कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकली. माझी दाढी आणि डोक्यावरील केस कापले. तिथे आम्हाला फक्त पायजमा, शर्ट, मोजे आणि बूट घालण्याची परवानगी होती. माझ्यासह इतर शीख तरुणांनी पगडी परत देण्याची विनंती केल्यावर अमेरिकन सैनिक म्हणाले की, जर कोणी त्याने फाशी घेतली तर त्याला जबाबदार कोण?," असंही मनदीप यांनी सांगितले.
विमानात ३६ तास बेड्या
रविवारी अमेरिकेतून आलेल्या ११२ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांमध्ये असलेल्या जतिंदर सिंग यांनीही तेथील एका डिटेंशन कॅम्पमध्ये घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. आमचा तिथे छळ करण्यात आला आणि योग्य जेवण मिळाले नाही. अमेरिकन सैनिकांनी मला पगडी काढण्यास भाग पाडल्यानंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. अमृतसरला परत येताना अमेरिकन लष्करी विमानात आम्हाला सुमारे ३६ तास बेड्या ठोकण्यात आल्याचेही जतिंदर सिंग यांनी सांगितले.
जेवणाला दिवसातून फक्त दोनदा ज्यूस अन् चिप्स
"गेल्या वर्षी २७ नोव्हेंबरला मला अमेरिकेत प्रवेश करताना पकडल्यानंतर मला दोन आठवड्यांसाठी डिटेंशन सेंटरमध्ये टाकण्यात आलं. मी १२ सप्टेंबर रोजी घर सोडलं होतं. डिटेंशन सेंटरमध्ये मला माझी पगडी काढण्यास सांगितली. हा इथला नियम असल्याचे सांगत त्यांनी पगडी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. तिथल्या सैनिकांनी कधी एसीचे टेंम्परेचर कधी खूपच कमी केले तर कधी हिटरचे तापमान खूपच वाढवलं. ज्यामुळे आमची त्वचा कोरडी झाली. आम्हाला तिथं व्यवस्थित जेवण देखील मिळालं नाही. त्यांनी आम्हाला फक्त चिप्स आणि दिवसातून दोनदा ज्यूस दिला होता," असंही जतिंदरने सांगितले.