शिक्षकाकडून सात मुलींवर अत्याचार
By Admin | Updated: August 13, 2014 04:09 IST2014-08-13T04:09:23+5:302014-08-13T04:09:23+5:30
बंगळुरूमध्ये एका खासगी शाळेतील शिक्षकाने सात मुलींवर ४५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

शिक्षकाकडून सात मुलींवर अत्याचार
बंगळुरू : एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच बंगळुरूमध्ये एका खासगी शाळेतील शिक्षकाने सात मुलींवर ४५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेमुळे लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध निदर्शने, मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे दिशादर्शक आणि इतर कठोर उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी शाळेच्या परिसरात सावजाच्या शोधात फिरणाऱ्यांवर आळा बसलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्व बेंगळुरुमधील शाळेत एका सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने क्षुब्ध नागरिक शहराच्या रस्त्यांवर उतरले होते. तर आता शहराच्या दुसऱ्या टोकावर शाळकरी मुलींवर त्यांच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
कानाकापुरा रोडवरील एका खासगी शाळेतील ६४ वर्षीय पार्टटाईम शिक्षकाने ४५ दिवसांहून अधिक काळ तिसऱ्या आणि चौथ्या वर्गातील सात मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
एका आठ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या पालकाच्या तक्रारीवरून शिक्षक चंद्रमौली याला ५ आॅगस्टला अटक करण्यात आली. चंद्रमौली हा निवृत्त पोस्टमन असून आपल्या मित्राच्या शाळेत तो शिक्षक आहे.
यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच शाळा तात्पुरती बंद करण्यात आली. शाळा सोमवारी पुन्हा सुरू झाली. परंतु शिक्षकाच्या भीतीने अनेक मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला. दरम्यान आणखी तीन मुलींच्या पालकांनी तालघट्टापुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राचार्य लक्ष्मीकांत यांना अटक करण्यात आली. त्यांची जामिनावर सुटका झाली. (वृत्तसंस्था)