“प्रियंका गांधींनी PM मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा लढवावी”; ममता बॅनर्जींचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:57 IST2023-12-20T17:53:18+5:302023-12-20T17:57:08+5:30
INDIA Alliance: प्रियंका गांधी यांना वाराणसीतून इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवावे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

“प्रियंका गांधींनी PM मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा लढवावी”; ममता बॅनर्जींचे मत
INDIA Alliance: देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदासाठीचा चेहरा बनवावे, असा प्रस्ताव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत दिला. यानंतर आता प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केले आहे.
'इंडिया' आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचविले. त्यावर खरगे यांनी आधी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असून, इतर गोष्टी नंतर ठरविता येतील, असे सांगितले. जानेवारी २०२४च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत वाराणसी लोकसभा मतदारसंघाच्या लढतीबाबत ममता बॅनर्जी यांनी मत व्यक्त केले.
प्रियंका गांधींनी PM मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा लढवावी
या बैठकीत बोलताना, प्रियंका गांधी यांनी वाराणसी येथून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढवायला हवी. इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी. समाजवादी पक्षाने प्रियंका गांधी यांच्या नावाला समर्थन द्यावे, असे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र, ममता बॅनर्जी यांनी यावर अधिक बोलणे टाळले. ममता बॅनर्जी यांच्या मताबाबत काँग्रेस पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, संसदेतून विरोधी सदस्यांच्या निलंबनाचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. खासदारांच्या निलंबनाविरोधात २२ डिसेंबरला देशभर निदर्शने करण्यात येणार आहेत. आजच्या बैठकीत २८ पक्षांच्या नेत्यांनी भविष्यात कसे काम करायचे हे ठरवले. सर्व पक्षांनी ८ ते १० जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे. आधी राज्य स्तरावर जागावाटपावर चर्चा होईल व काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा केली जाईल, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले.