Amit Shah on Kashmir: 'मला आनंद वाटत आहे की, आज काश्मीर पुन्हा एकदा भारताचे अविभाज्य अंग म्हणून विकासाच्या वाटेवर चालू लागला आहे. काश्मिरात लोकशाही प्रस्थापित झाली आहे आणि मला विश्वास आहे की, जे काही आम्ही गमावले, ते लवकरच परत मिळवू', असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केले.
'जम्मू काश्मीर, लडाख: सातत्य आणि संबंधाचा ऐतिहासिका वृत्तांत' या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बुधवारी झाले.
या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, "काश्मिरी, डोगरी, बाल्टी आणि झंस्कारी या भाषांना शासनाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मोदींचा आग्रह होता की, केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यानंतर काश्मिरीतील छोट्या छोट्या स्थानिक भाषा जिवंत ठेवायच्या आहेत. यावरून कळते पंतप्रधान काश्मीरबद्दल किती विचार करतात."
काश्मीरला तोडण्याचे प्रयत्न झाले होते - अमित शाह
अमित शाह म्हणाले, "काश्मीर भारताचे अविभाज्य अंग होते आणि राहील. काश्मीरला तोडण्याचे प्रयत्न लोकांनी केले, पण आम्ही ती गोष्टच हटवली आहे. इतिहास दिल्लीत बसून लिहिला जात नाही. त्यासाठी तिथे जाऊन समजून घ्यावे लागेल. सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ गेली आहे. मी भारतातील इतिहासकारांना आवाहन करतो की, पुरावांच्या आधारावर इतिहास लिहा", अशी भूमिका शाह यांनी मांडली.
शाह म्हणाले, "आपल्या सगळ्यांना माहितीये की, काश्मीरला कश्यपची भूमि म्हणून ओळखले जाते. कदाचित असेही असू शकते की, त्यांच्या नावावरून काश्मीर हे नाव पडले. जगात भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याची सीमा सांस्कृतिक परंपरांवर आधारित आहे. त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत अखंड आहे."