तीन ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने अधिका-यांची उडाली झोप, मोठा अपघात होता होता टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 14:46 IST2017-09-26T14:43:14+5:302017-09-26T14:46:23+5:30
उत्तर प्रदेशातील अलाहाबदमध्ये मंगळवारी मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. रेल्वे अधिका-यांना माहिती मिळताच त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरु झाली

तीन ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने अधिका-यांची उडाली झोप, मोठा अपघात होता होता टळला
अलाहाबाद - उत्तर प्रदेशातील अलाहाबदमध्ये मंगळवारी मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. रेल्वे अधिका-यांना माहिती मिळताच त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरु झाली. यानंतर तात्काळ तिन्ही ट्रेन्स थांबवण्यात आल्या. मात्र अधिकृतपणे या माहितीला कोणी दुजोरा दिलेला नाही.
Major accident averted after Duronto Express,Hatia-Anand Vihar Express and Mahabodhi Express were on the same railway track near Allahabad pic.twitter.com/bGyFE3TYQe
— ANI UP (@ANINewsUP) September 26, 2017
दुसरीकडे सोमवारी दिल्ली - हावडा मार्गावरील सराय भूपत आणि जसवंतनगर रेल्वे स्थानकांदरम्यान एका मोठी रेल्वे दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक तुटला होता. ज्यामुळे शताब्दी आणि राजधानीसहित इतर ट्रेनही थांबवण्यात आल्या होत्या. अधिका-यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्याचं काम केलं, आणि रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 वाजता एका रेल्वे कर्मचा-याने रेल्वे ट्रॅक तुटला असल्याचं पाहिल्यानंतर तात्काळ अधिका-यांना कळवलं. अधिका-यांनीही रेल्वे प्रमुखांना ही माहिती दिली आणि यानंतर 9 वाजून 2 मिनिटांनी शताब्दी एक्प्रेस रवाना करण्यात आली.
सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रिपद सोडले, पियुष गोयल नवे रेल्वे मंत्री
काही दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला होता. मात्र मोदींनी त्यांचा राजीनामा न स्वीकारता प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सुरेश प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपवण्यात आले. तर सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण किंवा उर्जा मंत्रालय सोपण्यात येऊ शकते.
उत्तर प्रदेशात १९ ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार व ४00 लोक जखमी झाले. त्यानंतर, पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७0 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले होते. स्वत: सुरेश प्रभू यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वकारून मी राजीनामा सादर केला आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुंबईजवळील कसारा येथे दुरान्तो एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला होता.