मंगळावर जाणाऱ्या १०० जणांत तीन भारतीय

By Admin | Updated: February 17, 2015 02:36 IST2015-02-17T02:36:15+5:302015-02-17T02:36:15+5:30

मंगळावर वसाहत करण्यासाठी उपांत्य फेरीत १०० लोकांची निवड करण्यात आली असून या साहसी नागरिकांत ३ जण भारतीय आहेत.

Three Indians from 100 to Mars | मंगळावर जाणाऱ्या १०० जणांत तीन भारतीय

मंगळावर जाणाऱ्या १०० जणांत तीन भारतीय

२०२४ ची योजना : पहिल्या टप्प्यात चारजण जाणार ग्रहावर; वसाहतीसाठी २०२,५८६ लोकांनी केला अर्ज
लंडन : मंगळावर वसाहत करण्यासाठी उपांत्य फेरीत १०० लोकांची निवड करण्यात आली असून या साहसी नागरिकांत ३ जण भारतीय आहेत. त्यात दोन महिला असून एक पुरुष आहे. २०२४ मध्ये यातील पहिले चारजण मंगळावर जातील. मंगळावर जाणारी ही खाजगी सहल असून, त्याअंतर्गत एकदाच मंगळावर जाण्याची सोय आहे.
मंगळावर वसाहतीसाठी जाण्यास इच्छुक असणाऱ्या २०२,५८६ लोकांनी अर्ज केले होते. त्यातील १०० जणांची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या लोकांना सध्या अंतराळात जाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नेदरलँडमधील विनानफा तत्वावर काम करणारी संघटना मार्स वन तर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मंगळावर मानवी वसाहत वसविण्यात येणार असून, त्यासाठी ४० लोकांना मंगळावर कायमचे राहण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. अंतिम निवड झालेल्या लोकांना सात वर्षे प्रशिक्षण दिले जाणार असून, २०२४ पासून दर वेळी चारजण याप्रमाणे लोक पाठविले जातील. मार्स १०० राऊंडमध्ये भारताचे तीन सदस्य आहेत. या १०० सदस्यात ३९ अमेरिकन असून, ३१ युरोपमधील आहेत. १६ अशियन असून, ७ आफ्रिकेतील आहेत तर ७ ओशियानातील आहेत.
गेल्यावर्षी जाहीर झालेल्या दुसऱ्या फेरीत ४४ भारतीय होते. या निवडीत निवड झालेल्या ६६० जणांतून १०० लोकांची निवड यावर्षीच्या तिसऱ्या फेरीत करण्यात आलेली आहे. मार्स वन संघटनेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नोबर्ट क्राफ्ट यांनी या लोकांची आॅनलाईन मुलाखत घेतली होती. धोक्याला तोंड देण्याची क्षमता, या सहलीत असणाऱ्या धोक्यांची जाणीव, जीवन बदलवणाऱ्या या मोहीमेत सहभागी होण्यासाठी मिळणारी प्रेरणा . या मुलाखतीत सहभागी होणारे सदस्य किती कणखर मनोवृत्तीचे आहेत हे यातून समजले , ही प्रक्रिया अत्यंत कठीण होती असे क्राफ्ट यांनी सांगितले. पुढच्या निवड फेरीत सर्व कष्ट सहन करु शकणारे गट तयार केले जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मार्स आऊटपोस्टची प्रत व अंतिम प्रशिक्षण पृथ्वीवर मिळणार आहे. (वृत्तसंस्था)

मंगळावर कायमचे जाण्याची तयारी असणाऱ्या भारतीय नागरिकांत तरणजित सिंग भाटिया (२९)- सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सची डॉक्टरेट करीत आहेत.
दोन भारतीय महिलांपैकी रितिका सिंग (२९) या दुबईत राहत असून श्रद्धा प्रसाद (१९) ही केरळमधील युवती आहे.

 

Web Title: Three Indians from 100 to Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.