RSS प्रमुखांना 'राष्ट्रपिता' म्हणणाऱ्या इमामांना शिरच्छेद करण्याच्या धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:29 IST2022-09-30T13:27:53+5:302022-09-30T13:29:11+5:30
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन प्रमुख उमर अहमद इलियासी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

RSS प्रमुखांना 'राष्ट्रपिता' म्हणणाऱ्या इमामांना शिरच्छेद करण्याच्या धमक्या
नवी दिल्ली: ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (AIIO) प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांना 'राष्ट्रपिता' म्हटले होते. त्यामुळे आता त्यांना शिरच्छेद करण्याच्या धमक्या येत आहेत. 23 सप्टेंबरपासून इंग्लंड आणि पाकिस्तानसह भारतातील अनेक भागांतून शेकडो फोन कॉल्सद्वारे त्यांना अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
23 सप्टेंबरपासून धमक्या
22 सप्टेंबर रोजी आरएसएस प्रमुख मोहन भागवत, सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल आणि ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून इमाम उमर अहमद इलियासी यांना धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र, आपण या धमक्यांना घाबरणार नाही किंवा झुकणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे दिले. इमाम इलियासी यांनी म्हटले की, ते देशात सद्भावना वाढवण्यासाठी काम करत राहतील आणि आरएसएस प्रमुखांबाबत केलेले वक्तव्य मागे घेणार नाही.
मोहन भागवतांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
मोहन भागवत आणि इलियासी यांनी बडा हिंदुराव येथील मदरशात जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांनी संघप्रमुखांच्या या उपक्रमाचे वर्णन धार्मिक सलोख्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊस असल्याचे म्हटले होते. तसेच, मोहन भागवत यांचे वर्णन 'राष्ट्रपिता' आणि 'राष्ट्रऋषी' असे केले होते. मोहन भागवत हे प्रचारक आहेत, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश आणि समाजसेवेसाठी समर्पित केले, म्हणूनच ते राष्ट्रपिता आहेत, असे इमाम म्हणाले होते.
इमामांनी पीएफआयवरील बंदीचे समर्थन केले
इलियासी यांनी मोहन भागवतांबाबत केलेले वक्तव्य काही राजकारण्यांना आणि कट्टरवाद्यांना आवडले नाही. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत इमाम यांनी म्हटले की, संघ प्रमुखांना भेटल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर विविध देश आणि भारतातील अनेक राज्यांमधून धमकीचे फोन येत आहेत. 'सर तन से जुदा' करण्याच्या धमक्या इमामांना मिळ आहेत. या संदर्भात इमाम उमर अहमद इलियासी यांनी 24 सप्टेंबर रोजी टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी गृहसचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, पीएफआयवर घातलेल्या बंदीचे समर्थन केल्यामुळेच, ते कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आल्याचे सांगण्यात येत आहे.