"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:29 IST2025-11-02T15:28:38+5:302025-11-02T15:29:02+5:30
पुढच्या वर्षापर्यंत एक कोटी नवीन रोजगारनिर्मिती केली जाईल आणि त्यासाठी संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आह, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. आज आरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी एनडीएचा जाहीरनामा आणि बिहारच्या विकासासंबंधी मोठे आश्वासने दिले. “दिल्लीतील काही लोकांना बिहारची हवा कोणत्या दिशेची आहे? हे समजत नाहीये. बिहारची जनता एनडीएसोबत आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, पुढच्या वर्षापर्यंत एक कोटी नवीन रोजगारनिर्मिती केली जाईल आणि त्यासाठी संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आह, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी पुढे म्हणाले, “1.30 कोटी महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आणि एनडीए सरकार परत आल्यावर ही मदत आणखी वाढवली जाईल.” यावेळी मोदींनी विरोधकांवर निशाणा साधताना, “एका बाजूला एनडीएचा प्रामाणिक जाहीरनामा आहे, तर दुसऱ्या बाजूला महागठबंधनाची आश्वासनं.
जनतेला आवाहन करत मोदी म्हणाले, “बिहारला पुन्हा जंगलराजपासून वाचवायचे आहे आणि एनडीएचे सरकार बनवायचे आहे. विकसित बिहार हाच विकसित भारताचा आधार आहे. बिहार हे देशातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी एक आहे. यामुळे एनडीए शिक्षण आणि कौशल्यविकासावर भर देत आहे." एवढेच नाही तर, बिहारमधील तरुण बिहारमध्येच काम करेल आणि बिहारचे नाव उज्ज्वल करेल,” असेही ते म्हणाले.
आर्थिक मुद्द्यांवर बोलताना मोदी म्हणाले, बिहारमधील 60 लाख गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 9,000 रुपये मिळतील. बिहारला ‘मेड इन इंडिया’चे केंद्र बनवण्याचा आमचा संकल्प आहे, ज्यासाठी लघु आणि कुटीर उद्योगांचे जाळे मजबूत केले जाईल.”
यावेळी आरजेडीवर टीका करताना, “आरजेडीच्या जंगलराजची ओळख म्हणजे कट्टा, क्रूरता, कुसंस्कार आणि भ्रष्टाचार,” असेही मोदी म्हणाले.