मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:57 IST2025-05-13T11:54:02+5:302025-05-13T11:57:08+5:30
गेल्या २७ वर्षांपूर्वी, संबंधित महिलेकडून कळत-नकळत एक मोठा अपराध घडला होता. यामुळे त्यांना स्वस्थ झोपही येत नव्हती. याच्याच पश्चात्तापाचा एक भाग म्हणून आता त्यांनी वाराणसी येथे येऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे...

मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील गंगा नदीच्या काठावर असलेल्या दशाश्वमेध घाटावर एक अनोखे दृश्य बघायला मिळाले. येथे बांगलादेशी मुस्लीम महिलेने सनातन हिंदू धर्म स्वीकारला. लंडनमध्ये वाढलेल्या या महिलेने एका ख्रिश्चन धर्मीय तरुणासोबत लग्न केले होते. गेल्या २७ वर्षांपूर्वी, संबंधित महिलेकडून कळत-नकळत एक मोठा अपराध घडला होता. यामुळे त्यांना स्वस्थ झोपही येत नव्हती. याच्याच पश्चात्तापाचा एक भाग म्हणून आता त्यांनी वाराणसी येथे येऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे.
या मूळच्या बांगलादेशी मुस्लीम महिलेचे नाव अंबिया बानो असे आहे. त्यांनी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर, संपूर्ण वैदिक विधींसह सनातन धर्म स्वीकारला आहे. त्या लंडनमध्ये राहतात. पुजारी पंडित रामकिशन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अंबिया यांनी पंचगव्यांने स्वतःची शुद्धी करून घेतली आणि पाच वैदिक ब्राह्मणांच्या मदतीने दशाश्वमेध घाटावर आपल्या न जन्मलेल्या मुलीचे पिंडदान केले. आता त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात म्हणून त्यांचे नाव बदलून अंबिया माला असे करण्यात आले आहे.
अंबिया माला (बदललेले नाव) या ४९ वर्षांच्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे लग्न नेव्हिल बॉर्न ज्युनियर नावाच्या एका ख्रिश्चन तरुणाशी झाले होते. नेव्हिलने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि दोघांनी लग्न केले होते. सुमारे १० वर्षे एकत्रित राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान, सुमारे २७ वर्षांपूर्वी, पाश्चात्य विचारसरणीच्या प्रभावाला बळी पडून, अंबिया यांनी गर्भपात करून घेतला होता. त्यावेळी केलेला गर्भपात त्यांना आजपर्यंत स्वस्थ जगू देत नव्हता.
अंबिया यांना २७ वर्षांपूर्वी झालेल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होत होता. त्यांच्या न जन्मलेल्या मुलीचा आत्मा त्यांच्या स्वपनात येऊन वारंवार मुक्तीची अथवा मोक्षाची याचना करत होता. या दुःखाने आणि पश्चात्तापाने त्यांना भारतातील वाराणसी येथे येण्यास प्रवृत्त केले. येथे येऊन त्यांनी त्यांच्या न जन्मलेल्या मुलीचे पिंडदान केले.
अंबिया सांगतात की, प्रचंड संशोधन आणि अभ्यासानंतर, गर्भाशयात वाढणारे मूलही एक जीव असते आणि ते मारणेही पापच आहे, हे आपल्या लक्षात आले. या जाणिवेने अंबिया सनातन धर्माकडे आकर्षित झाल्या. तसेच, प्रत्येक धर्माचे मूळ सनातन धर्मात आहे आणि आता मला आध्यात्मिक शांती मिळत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.