जबलपूर पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू असलेल्या जनसुनावणी दरम्यान एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली. एका पतीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केल्याच्या प्रकारामुळे कार्यालयात थेट संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे काही वेळ एसपी कार्यालय हे चांगलेच चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.
पतीच्या दुसऱ्या लग्नावरून पत्नींमध्ये जुंपली
जबलपूरच्या रांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अभिषेक सोनकर या युवकावर त्याची पहिली पत्नी प्रीती वंशकार हिने गंभीर आरोप केले आहेत. प्रीतीच्या मते, अभिषेकने तिला घटस्फोट न देता दुसऱ्या महिलेशी गुपचूप लग्न केले. या प्रकरणाची तक्रार घेऊन प्रीती आपल्या मुलासह थेट एसपी कार्यालयात पोहोचली, जिथे तिला अभिषेकच्या दुसऱ्या पत्नीचा सामना करावा लागला.
यावेळी दोन्ही महिला एकमेकींवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत भांडू लागल्या. प्रकरण एवढं वाढलं की, दोघींनी एकमेकांचे केस ओढणे, एकमेकींवर चपला आणि पाण्याच्या बाटल्या फेकणे सुरू केले. हे पाहून कार्यालयात उपस्थित पोलीसही काही काळ बुचकळ्यात पडले.
पतीने फसवलं, पहिल्या पत्नीचा आरोप
अभिषेकची पहिली पत्नी प्रीती वंशकार हिच्या मते, पतीच्या सांगण्यावरून तिने नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली होती, परंतु त्यानंतरही अभिषेकने तिला न सांगता दुसरे लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले होती, यापैकी एक मुलगी नुकतीच वारली आहे. अशा दु:खद प्रसंगातही पतीने दुसरे लग्न केल्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला, असे प्रीतीचे म्हणणे आहे.
दुसरी पत्नी म्हणते, मीच कायदेशीर पत्नी!
दुसऱ्या बाजूला अभिषेकची दुसरी पत्नी स्वतःला त्याची कायदेशीर पत्नी असल्याचे सांगत आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत त्याला सोडणार नसल्याचे ठामपणे सांगत आहे. एसपी कार्यालयासमोर दोघी महिला जोरदार वाद घालत होत्या आणि त्यावेळी त्यांचा पती अभिषेक त्या गोंधळात शांतपणे उभा होता.
पोलिसांकडून हस्तक्षेप, पण समाधान नाही!
या गोंधळानंतर पोलिसांनी तिघांनाही सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात नेले आणि समजुतीने प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. या प्रकरणाबाबत बोलताना डीएसपी (हेडक्वार्टर) भगत सिंह गौथरिया यांनी सांगितले की, पहिल्या पत्नीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. जर अभिषेकने खरोखर घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ही संपूर्ण घटना सध्या जबलपूरमध्ये चर्चेचा विषय बनली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.