'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:25 IST2025-11-03T17:24:43+5:302025-11-03T17:25:19+5:30
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले.

'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी अपमानाचे मंत्रालय स्थापन करावे कारण ते सतत विरोधी नेत्यांवर देशाचा आणि बिहारचा अपमान केल्याचा आरोप करतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
काही दिवसांपूर्वी पीएम मोदी यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला छठपूजेचा अपमान अपमान असे म्हटले होते. या टीकेला आता प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका रॅलीदरम्यान ही टीका केली. राहुल गांधी यांनी रेखा सरकारने दिल्लीत छठपूजेसाठी बांधलेल्या घाटाचा उल्लेख केला होता.
राहुल गांधींची टीका काय होती?
राहुल गांधी म्हणाले होते, "त्यांनी एक नाटक केले आणि भारताबद्दलचे सत्य उघड केले. यमुनेचे पाणी घाणेरडे आहे. ते प्यायल्याने तुम्ही आजारी पडाल किंवा मराल. कोणीही त्यात जाऊ शकत नाही. पाणी इतके घाणेरडे आहे की जर तुम्ही त्यात पाऊल ठेवले तर तुम्ही आजारी पडाल किंवा संसर्ग होईल. पण पंतप्रधान मोदींनी एक नाटक केले."
राहुल गांधी म्हणाले, "त्यांनी तिथे एक लहान तलाव बांधला. निवडणुकीच्या वेळी ते तुम्हाला काहीही दाखवतील. मागून एक पाईप बसवण्यात आला होता. त्यातून स्वच्छ पाणीपुरवठा केला जात होता. पण समस्या अशी होती की कोणीतरी पाईपचा फोटो काढला." पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या हल्ल्याला छठचा अपमान असल्याचे म्हटले होते.
प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला
पंतप्रधान मोदींनी विचारले, "मतांसाठी छठीमैय्याचा अपमान करणाऱ्यांना बिहार आणि भारत माफ करेल का? छठच्या वेळी उपवास करणाऱ्या माता आणि भगिनी अशा अपमान सहन करतील का आणि त्यांना शिक्षा करणार नाहीत का?" प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या उत्तरावर टीका केली.
"पंतप्रधान अनावश्यक मुद्द्यांवर बोलतात, परंतु बिहारमधील एनडीए सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराबद्दल एकही शब्द बोलत नाहीत, अशी टीका प्रियांका गांधीनी केली. त्यांनी बिहार सरकारवर दिल्लीवरून रिमोट कंट्रोल असल्याचा आरोपही केला.