उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात स्थानिक भाजपा नेता राहुल वाल्मिकी हा स्मशानभूमीजवळ कारमध्ये एका महिलेसोबत चाळे करताना रंगेहात पकडला गेल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्हिडीयोमध्ये भाजपाच्या नेत्यासोबत दिसणाऱ्या महिलेने गावातीलच सहा जणांवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात व्हायरल होत असलेल्या व्हिडीयोमध्ये जे काही दिसत आहे ते आपल्याकडून बळजबरीने करवून घेण्यात आले. तसेच मला आणि भाजपा नेत्याला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने हे सर्व करण्यात आले, असा आरोप या महिलेने केला आहे.
याबाबत सदर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, ही घटना सात ते आठ महिन्यांपूर्वीची आहे. माझे आणि भाजपा नेता राहुल वाल्मिकीचे बऱ्याच दिवसांपासून संबंध आहेत. तसेच या संबंधांबाबत माझ्या पतीला तसेच राहुलच्या कुटुंबीयांना माहिती आहे. तसेच त्यांची याबाबत कुठलीही तक्रार नाही आहे. मात्र या संबंधांवरून काही लोक आम्हाला वारंवार त्रास देत होते. तसेच व्हिडीयो तयार करून आम्हााल ब्लॅकमेल करत होते.
या महिलेने एकूण सहा जणांविरोधात तक्रार दिली आहेत. त्यात तिघांची नावं आहेत. तर उर्वरित तिघे अज्ञात आहेत. त्यांनी आपले जबरदस्तीने व्हिडीओ काढले, अश्लील हावभाव करण्यास भाग पाडले. तसेच व्हिडीयो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच आरोपींनी भाजपा नेता राहुल वाल्मिकी याला जबरदस्तीने पँट उतरवण्यास भाग पाडले आणि पुढील व्हिडीयो चित्रित केला, असा आरोप या महिलेने केला आहे.
हा व्हिडीयो व्हायरल करण्यापूर्वी आरोपींनी पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे न मिळाल्याने त्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला. ज्या आरोपींनी हा व्हिडीयो व्हायरल केला त्यांनी आपल्यावर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला होता, तसेच जातिवाचक शिविगाळ करत अपमानित केले. असा आरोपही या महिलेने केला आहे.