हरियाणा आणि आसामसह देशातील अनेक राज्यांमध्ये बंगाली भाषिक मुस्लिम लोकांना ताब्यात घेतले जात आहे. यावरून आता देशातील राजकारण तापताना दिसत आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख तथा हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले आहे. "या लोकांना विनाकारण बेकायदेशीर नागरिक म्हटले जात आहे, ते भारतीय नागरिक आहेत, असे म्हणत, ओवेसी यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. याच वेळी त्यांनी पोलिसांवर पक्षपात आणि अत्याचाराचा आरोपही केला.
एआयएमआयएम प्रमुख ओवेसी यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, "भारताच्या विविध भागात पोलिस बंगाली भाषिक मुस्लिम नागरिकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेत आहेत आणि त्यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करत आहेत. भारतीय नागरिकांना बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जात असल्याच्या चिंताजनक बातम्या आल्या आहेत. हे सरकार कमकुवत लोकांशी कठोरपणे वागते."
पुढे ओवैसी म्हणाले, "ज्यांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हटले जात आहे ते सर्वात गरीब आहेत, यातील बहुतेक झोपड्यांमध्ये राहतात. हे लोक घरकाम, सफाई आणि कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे, कारण ते पोलिसांच्या अत्याचारांना आव्हान देऊ शकत नाहीत."
ओवेसी यांनी एक्स अकाउंटवर गुरुग्रामच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका आदेशाचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे, "पोलिसांना केवळ विशिष्ट भाषा बोलत असल्याने लोकांना ताब्यात घेण्याचा अधिकार नाही. ही सामूहिक अटक बेकायदेशीर आहेत."