कधी काळी १२ लाखांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर द्यावा लागत होता; मोदींनी केली नेहरु-इंदिरांच्या सरकारसोबत तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:11 IST2025-02-02T15:11:11+5:302025-02-02T15:11:23+5:30
पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते की त्यांना जीएसटी सारखा अप्रत्यक्ष कर मिळत जाईल.

कधी काळी १२ लाखांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर द्यावा लागत होता; मोदींनी केली नेहरु-इंदिरांच्या सरकारसोबत तुलना
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पातील १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील करमुक्तीचा मुद्दा दिल्ली विधानसभा निवडणुकीत मांडण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील आर के पुरममधील प्रचार सभेत कालच्या अर्थसंकल्पातील घोषणांची भारताच्या स्वातंत्र्य काळाशी तुलना केली आहे. नेहरु-इंदिरा गांधींच्या काळात १२ लाखांच्या पगारावर ३ लाख रुपये कर द्यावा लागायचा, आताच्या अर्थसंकल्पाकडे पहा, असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते. तसेच एवढा पगारही किंवा करदात्याचे उत्पन्नही फार कमी, म्हणजे हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच लोकांचे होते. अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सच रद्द करावा अशीही मागणी जनतेतून होत होती. परंतू, त्यांनी नवीन कर प्रणालीकडे लोकांनी वळण्यासाठी ही १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर करमुक्तीची घोषणा केली आहे.
प्रचारसभेत पुढे मोदींनी आपवरही निशाना साधला. 'यावेळी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीच्या 'आपत्ती' पक्षाने येथे ११ वर्षे वाया घालवली. मला राज्यातील दिल्लीतील लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मी विनंती करतो', असे मोदी म्हणाले. तुमच्या प्रत्येक समस्येचे आणि अडचणीचे निराकरण करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, अशी मी हमी देतो. सबबी सांगण्याऐवजी कामे करणारे सरकार आपल्याला स्थापन करावे लागणार आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
मतदानापूर्वीच झाडूच्या काड्या विखुरल्या जात आहेत. 'आपत्ती'मुळे जमिनीवरील लोक किती संतापले आहेत हे त्या लोकांना समजले आहे. यामुळे हे लोक सोडून जात आहेत. हा पक्ष दिल्लीतील लोकांच्या रोषाला इतका घाबरला आहे की दर तासाला वेगवेगळ्या घोषणा करत सुटला आहे. गेल्या १० वर्षांपासून ते त्याच खोट्या घोषणांवर पुन्हा पुन्हा मते मागत आहेत. आता आम्ही हे खोटेपणा सहन करणार नाही, असे मोदी म्हणाले. मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी. मोदी जे काही बोलतात ते करतात. गेल्या १० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. जर परिस्थिती पूर्वीसारखीच असती तर देशाचे हे वाढते उत्पन्न घोटाळ्यांमध्ये गेले असते. काही लोकांनी ते हडप केले असते, अशी टीका मोदी यांनी केली.