देशात ८२६ नवे रुग्ण, देशातील एकूण रुग्णांची संख्या १३ हजार ४२५
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:25 IST2020-04-17T06:25:30+5:302020-04-17T06:25:39+5:30
महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

देशात ८२६ नवे रुग्ण, देशातील एकूण रुग्णांची संख्या १३ हजार ४२५
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले ८२६ नवे रुग्ण आढळल्याने देशातील एकूण रुग्णांची संख्या १३ हजार ४२५ झाली आहे. एकूण ३७० जिल्ह्यांमध्ये हे रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाने गेल्या २४ तासांत २८ जण मरण पावले. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४४६ झाली आहे. मात्र आतापर्यंत १५०४ रुग्ण उपचारांमुळे बरेही झाले आहेत.
महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राजस्थानमध्ये ११०१, मध्य प्रदेशात १११५, तर गुजरातमध्ये ९७१ रुग्ण आहेत. तामिळनाडू आणि दिल्लीत १ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जगभर २१ लाख रुग्ण जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा २१ लाख २९ हजारांवर गेला आहे आणि मृतांची संख्या १ लाख ४२ हजारांच्या वर गेली आहे. आतापर्यंत ५ लाख २६ हजार रुग्ण बरेही झाले आहेत, तर ५१ हजार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिका (२८ हजार ७००), इटली (२१ हजार ६४५), स्पेन (१९ हजार १३०), फ्रान्स (१७ हजार २००) आणि ब्रिटन (१३ हजार ८००) या पाच देशांमध्येच सुमारे १ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगात ५३ देशांमध्ये ३३३६ भारतीयांना बाधा
एकूण ५३ देशांत ३३३६ भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यापैकी २५ जण मरण पावले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
मात्र कोणत्या देशात किती भारतीय रुग्ण आहेत, हे समजू शकले नाही.