...तर रामभक्तांचा उद्रेक होईल-विनय कटियार
By Admin | Updated: June 4, 2015 00:42 IST2015-06-04T00:42:58+5:302015-06-04T00:42:58+5:30
अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता

...तर रामभक्तांचा उद्रेक होईल-विनय कटियार
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता पक्षाचे नेते बयाणबाजी करून पक्ष व सरकारवर दबाव आणत आहेत, तर भाजप नेतृत्व अधिकृतपणे या मुद्यावर आपली वचनबद्धता जाहीर करतानाच यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताचे कारण पुढे करीत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच राम मंदिर निर्मितीसह पक्षाच्या पारंपरिक पण वादग्रस्त मुद्यांबाबत वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली होती. सोबतच त्यांच्या अंमलबजावणीसाठी लोकसभेत त्यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत म्हणजेच ३७० जागा मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.
परंतु आता उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी भूसंपादनाप्रमाणेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी वटहुकूम काढण्याची मागणी केली आहे. राम मंदिरासाठी रामभक्तांनी फार मोठे बलिदान दिले असून हा मुद्दा आता जास्त दिवस लांबणीवर टाकता येणार नाही, अन्यथा रामभक्तांच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी बुधवारी लखनौत बोलताना दिला.
कटियार म्हणाले की, मोदी सरकार या मुद्यावर सत्तेत आले नसले तरी भाजपच्या मतदारांसाठी तो देशाच्या विकासाएवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता सरकारने चर्चेतून अथवा कायद्याच्या माध्यमातून या मुद्यावर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव व माध्यम विभागाचे प्रमुख श्रीकांत शर्मा यांनी कटियार यांच्या वक्तव्यावर कुठलीही टिपणी करण्यास नकार देताना सांगितले की, अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मिती हा पक्षासाठी आस्था व वचनबद्धतेचा प्रश्न आहे.