...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 08:11 IST2025-09-22T08:08:50+5:302025-09-22T08:11:58+5:30
भारतीय कायद्यात ‘प्रेमात दुरावा’ या संकल्पनेला थेट मान्यता नसली तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्यास नुकसानभरपाईचा दावा ग्राह्य ठरू शकतो.

...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली - विवाहसंबंधात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रेमात दुरावा निर्माण झाल्याचे म्हणत यास जबाबदार पतीच्या प्रेयसीकडून नुकसानभरपाई मागणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने ग्राह्य धरली आहे.
शेली महाजन यांचा २०१२ मध्ये विवाह झाला. दाम्पत्याला २०१८ मध्ये जुळी मुले झाली. २०२१ मध्ये भानुश्री ही महिला पतीच्या व्यवसायात सामील झाली. पुढे तिचे पतीसोबत प्रेमसंबंध विकसित झाले. २०२३ मध्ये पत्नीला याचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर तणाव तीव्र झाला. पत्नीने जाब विचारल्यावर पतीने उघडपणे भानुश्रीसोबत सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावून पत्नीला अपमानित करणे सुरू केले.
एप्रिल २०२५ मध्ये पतीने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला. यानंतर पत्नीने नागरी नुकसानभरपाईसाठी हायकोर्टात दावा केला. या दाव्यावर भानुश्रीच्या वतीने आक्षेप घेताना हा वाद वैवाहिक बंधातूनच निर्माण झालेला असून, त्यावर सुनावणीचा अधिकार केवळ फॅमिली कोर्टालाच आहे, असे म्हटले.
प्रौढांना स्वेच्छेने नातेसंबंध ठेवण्याचा अधिकार
घटस्फोटाच्या प्रकरणात आधीच व्यभिचाराचा मुद्दा उपस्थित झाला असून, त्यावर निर्णय झालेला नाही. हा दावा फक्त त्याला प्रत्युत्तर आहे. प्रौढ व्यक्तींना स्वेच्छेने नातेसंबंध ठेवण्याचा अधिकार असून, पत्नीला तो रोखण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. पत्नीच्या वकिलांनी मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या जाणीवपूर्वक वर्तनामुळे तिला पतीच्या प्रेमापासून वंचित व्हावे लागले. दिवाणी कायद्यानुसार अशा हस्तक्षेपाबाबत नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार आहे, असा दावा केला.
हायकोर्टाचे निरीक्षण
भारतीय कायद्यात ‘प्रेमात दुरावा’ या संकल्पनेला थेट मान्यता नसली तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्यास नुकसानभरपाईचा दावा ग्राह्य ठरू शकतो. फॅमिली कोर्टाचा अधिकार वैवाहिक विवादांपुरता मर्यादित असून, स्वतंत्र दिवाणी दाव्यावर दिवाणी न्यायालयाला सुनावणीचा अधिकार आहे. घटस्फोटाचा खटला सुरू असला, तरी पतीबरोबर संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पत्नीला स्वतंत्र दिवाणी नुकसानभरपाईचा दावा करता येतो. पतीला वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क असला तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक हस्तक्षेप केल्यास दिवाणी जबाबदारी निर्माण होते. - न्यायमूर्ती पुरुषेन्द्र कुमार कौरव