मग पंतप्रधानांचा पगारही वाढवा ना ! - केजरीवाल
By Admin | Updated: December 5, 2015 15:02 IST2015-12-05T14:57:11+5:302015-12-05T15:02:19+5:30
दिल्ली आमदारांच्या पगारात ४०० टक्क्यांची वाढ सुचवणारे विधेयक मंजूर केल्याने टीकेचा सामना करावा लागणा-या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क 'पंतप्रधानांचाच पगार वाढवण्याचा' अजब सल्ला दिला.

मग पंतप्रधानांचा पगारही वाढवा ना ! - केजरीवाल
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - दिल्लीतील आमदारांच्या पगारात ४०० टक्क्यांची घसघशीत वाढ सुचवणारे विधेयक मंजूर केल्याने टीकेचा सामना करावा लागणा-या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क 'पंतप्रधानांचाच पगार वाढवण्याचा' अजब सल्ला दिला आहे. 'आमदारांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगार कमी असेल, तर मग त्यांचाही पगार वाढवायला हवा. त्यांचा पगार वाढवण्याची आम्ही सर्वजण मागमी करतो' असे केजरीवाल यांनी काल विधानसभेत म्हटले.
आमदारांच्या पगारात तब्बल ४०० टक्क्यांची वाढ सुचवणारे वेतन वाढीचे विधेयक गुरूवारी दिल्ली विधानसभेत मंजूर झाल्याने आता दिल्लीतील आमदारांचा पगार हा पंतप्रधानांपेक्षाही जास्त झाला आहे. या विधेयकामुळे आमदारांना दरमहा ८८ हजारांऐवजी तब्बल दोन लाख रुपये मिळणार आहेत. तसेच त्यांचे पेन्शन व विविध भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे. मात्र केजरीवाल सरकारच्या या निर्णयावर चहूबाजूंनी टीका होत असून भाजपाने सभात्याग केला तर शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'आप'विरोधात निदर्शने केली.
मात्र या सर्व टीकेचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. आपला निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांनाच पगारवाढ सुचवली आहे. ' उद्या मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट झाली तर ते काय म्हणतील? पंतप्रधानांचा मासिक पगार कमीत-कमी आठ ते दहा लाख तरी असलाच पाहिजे' असा अजब सूचनावजा सल्ला त्यांनी दिला.
एवढचं नव्हे तर ही वाढ लागू झाल्यानंतरही आमदारांना एखाद्या मीडिया ऑर्गनायझेशनचे संपादक वा टॉप टी.व्ही. अँकर्सना मिळणा-या मानधनाच्या तुलनेत अत्यल्प पगार मिळेल, असे सांगत त्यांनी या पगारवाढीचे समर्थनच केले.
या नव्या विधेयकामुळे दिल्ली आमदारांचा बेसिक पगार १२ हजारांवरून ५० हजार इतका झाला असून त्यांचे महिन्याचे पॅकेज २ लाख १० हजार रुपये इतके होईल. तसेच याआधी त्यांना केवळ देशांतर्गत दौ-यांसाठी भत्ता दिला जात असे, मात्र आता परदेश दौ-यांसाठी भत्ता मिळणार आहे.