उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका तरुण-तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, परंतू त्यांचे हे लग्न १८ तासांतच मोडले आहे. नवरदेवानुसार नवरीने एक अशी गोष्ट लपविली ती कळल्यावर त्याने त्या वधुला स्विकारण्यास नकार दिला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले व नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने ते वेगळे झाले.
झाशीमध्ये हा प्रकार घडला आहे. देशभरात बहुतांश ठिकाणी अद्याप जात-पात पाळली जाते. झाशीच्या प्रकरणात मुलीकडच्यांनी त्यांची जात लपवून दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न केले आहे. जेव्हा याची माहिती नवरदेवाला आणि कुटुंबाला झाली तेव्हा मोठा गोंधळ उडाला. २८ वर्षांचा नवरदेव धर्मेंद्र हा बसाई गावाचा रहिवाशी आहे. त्याचे वडील सगुन हे बऱ्याच काळापासून आपल्या मुलासाठी योग्य मुलगी पाहत होते.
अनेकजण धर्मेंद्रसाठी मुलगी सुचवत होते. वय वाढत चालले होते. शोध सुरु असताना गावातीलच एका तरुणाने मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील करैरा भागात एक मुलगी आहे, तिचा भाऊ तिच्यासाठी स्थळ शोधत असल्याचे सांगितले. विचारपूस केली असता मुलीच्या भावाने त्यांना एकसारखीच जात सांगितली, म्हणून सगून सोयरिकीला तयार झाले. वधूच्या भावाने या लग्नासाठी ५०००० रुपये मागितले. सगुन यांनी त्याला पहिले २०००० रुपये देऊनही टाकले. बोलणी झाली आणि २७ जूनला लग्नाची तारीख निघाली.
झाशीच्या प्रसिद्ध बडी माता मंदिरात हा विवाह पार पडला. पारंपारिक विधींनुसार हा विवाह पार पडला. सर्व काही सुरळीत सुरु होते, परंतु लग्नादरम्यान मुलीचा भाऊ दारू पिऊन असे काही बोलला ज्यामुळे संपूर्ण सत्य उघड झाले. आमची जात वेगळी आहे, हे लग्न होऊद्या, बाकीचे आम्ही सांभाळू, असे तो बोलून गेला. लग्नात उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला. मुलाच्या कुटुंबाने प्रश्न उपस्थित केल्यावर, मुलीचा भाऊ वाद घालत निघून गेला. लग्नात उपस्थित असलेले सगुनचे कुटुंब स्तब्ध झाले. पण विधी पूर्ण झाले होते, म्हणून त्यांनी नवविवाहितेला त्यांच्यासोबत गावात आणले.
पुढे मुलीचा ड्रामा सुरु झाला. घरात आल्यावर ती कोणाशी बोलली नाही तसेच जेवणही केले नाही. यामुळे मुलाकडचे पोलीस ठाण्यात गेले. तिच्या भावालाही बोलविण्यात आले. मग सर्व प्रकार पुढे येताच मुलीला भावासोबत पाठवून देण्यात आले.