जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:32 IST2025-10-28T13:31:29+5:302025-10-28T13:32:36+5:30
कुटुंबाने वर्षांनुवर्षे घाम गाळून कमावलेली संपत्ती गमावूनही त्यांच्या हाती काहीच आले नाही. उलट, अमेरिकन प्रशासनाने बेड्या घालून त्यांचा जो अपमान केला आहे, त्याची जखम आयुष्यभर भरून निघणारी नाही.

जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
राहते घर-दुकान, शेतजमीन विकून 'डंकी रूट'ने अमेरिकेला जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ५४ तरुणांना अमेरिकेने थेट बेड्या घालून मायदेशी परत पाठवले आहे. या घटनेमुळे त्यांची सारी स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. कुटुंबाने वर्षांनुवर्षे घाम गाळून कमावलेली संपत्ती गमावूनही त्यांच्या हाती काहीच आले नाही. उलट, अमेरिकन प्रशासनाने बेड्या घालून त्यांचा जो अपमान केला आहे, त्याची जखम आयुष्यभर भरून निघणारी नाही. हरियाणातील या तरुणांमध्ये १६ कर्नाल आणि १४ कैथल जिल्ह्यातील आहेत. शनिवारी त्यांना दिल्ली विमानतळावर आणण्यात आले आणि रविवारी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
जमीन आणि दुकान विकून अमेरिका गाठली, पण...
या तरुणांपैकी २० वर्षीय रजत पाल याची कहाणी ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील. रजतचे वडील संगोही येथे मिठाईचे दुकान चालवायचे. कुटुंबाच्या चांगल्या भविष्याच्या आशेने रजत २६ मे रोजी अमेरिकेसाठी निघाला. मात्र, त्याचा हा मार्ग सोपा नव्हता. त्याला घनदाट जंगल आणि अत्यंत धोकादायक मार्गाने पायपीट करत जायचे होते, यालाच 'डंकी रूट' म्हणतात. रजतच्या स्वप्नांसाठी त्याचा भाऊ विशाल याने आपल्या मालकीचा एक प्लॉट आणि दुकान विकले. तब्बल 45 लाख रुपयांची सोय केली. एजंटने त्याला अमेरिकेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, त्यासाठी अतिरिक्त १५ लाख रुपयेही मोजावे लागले.
पनामाच्या जंगलातील भयानक प्रवास आणि भूकेचे संकट
रजतने आपल्या भयानक प्रवासाचा अनुभव कथन करताना सांगितले की, "आमच्या ग्रुपमध्ये १२ ते १३ लोक होते. पनामाच्या जंगलातून आम्हाला रस्ता शोधावा लागला. खायला खूपच कमी मिळत होते. हा मार्ग जीवघेणा होता आणि भूकेने आम्ही सगळे हैराण झालो होतो. अमेरिकेत पोहोचल्यानंतर आपले सगळे कष्ट दूर होतील, अशी आशा प्रत्येकाच्या मनात होती." पण, तिथे त्यांना पकडून १४ दिवस तुरुंगात ठेवले गेले आणि २० ऑक्टोबरला सर्वांना डिपोर्ट करण्याची बातमी देण्यात आली. या अवैध मार्गाने कोणीही अमेरिकेला जाऊ नका, असा कळकळीचा सल्ला रजतने दिला आहे.
१४ महिने तुरुंगात, ५७ लाखही गमावले!
रजतचे भाऊ विशाल यांनी सांगितले की, "आम्ही रजतला अमेरिकेला पाठवण्यासाठी मालमत्ता विकली, कर्जही घेतले." तर तारागढ गावातील नरेश कुमार यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. अमेरिका गाठण्यासाठी त्यांना ५७ लाख रुपये खर्च करावे लागले आणि तब्बल १४ महिने अमेरिकेच्या तुरुंगात काढावे लागले. "प्रत्येक बॉर्डर क्रॉस करताना एजंटांची पैशाची मागणी वाढत गेली. हे सगळं एका वाईट स्वप्नासारखं होतं," असे नरेश कुमार यांनी म्हटले.
२५ तास बेड्यांमध्ये, जनावरांसारखी वागणूक!
अंबालाच्या जगोली गावातील हरजिंदर सिंग यांचेही अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न होते. किमान आमच्या आत्मसन्मानाचा तरी विचार करायला हवा होता, असे म्हणत त्यांनी अमेरिकेतील वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. "आम्हाला २५ तास बेड्यांमध्ये बांधून ठेवण्यात आले. माझे हात-पाय सुजले होते. आमच्यासोबत जनावरांसारखे वागणूक करण्यात आली," असा गंभीर आरोप त्यांनी केला. हरजिंदर यांनी अमेरिकेत कुकिंग शिकून शेफची नोकरी मिळवली होती आणि चांगली कमाईही करत होते. मात्र, प्रशासनाने त्यांना पकडले आणि डिपोर्ट केले.