भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 11:49 IST2025-07-20T11:49:05+5:302025-07-20T11:49:23+5:30

शुभांशू यांचा अंतराळ प्रवास ही भारतीय अंतराळ संशोधनाची सुरुवात आहे. कारण, यानंतरच्या अनेक मोहिमा शुभांशू यांच्या अनुभवावर आधारित असतील.

The world will see India's strength! Gaganyaan gets strength from Shubanshu Shukla's experience, preparations for indigenous mission | भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी

भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी

चारूदत्त पुल्लिवार
खगोलतज्ज्ञ, रमन विज्ञान केंद्र व तारामंडळ 

मुद्द्याची गोष्ट : २० दिवसांचा अंतराळ प्रवास करून भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतले. येत्या २०२७ साली भारतासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ या मानवयुक्त मोहिमेची तयारी सुरू आहे. शुभांशू यांचा हा प्रेरणादायी प्रवास आणि अनुभव या महिमेची लिटमस टेस्टच होय.

अॅक्सिओम-४ मिशनअंतर्गत स्पेस-एक्स व अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा यांच्या सहकार्याने २५ जून २०२५ रोजी भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे चार अंतराळवीरांसह ‘ड्रॅगन ग्रेस’ या यानाने अंतराळाकडे झेपावले व आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर पोहोचले. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते. त्यानंतर शुभांशू हे दुसरे भारतीय. मात्र, अंतराळ संशोधन केंद्रावर जाऊन तेथे प्रयोग करणारे ते पहिलेच भारतीय. २० दिवसांच्या या प्रवासात शुभांशू १८ दिवस व काही तास केंद्रावर राहिले. त्यांनी पृथ्वीभोवती ३२० परिक्रमा करीत ६० लाख मैलांचे अंतर कापले. 

या काळात त्यांनी इस्रो आणि नासा यांच्या करारानुसार ६० विविध प्रयोग केले, जे पुढच्या भारतीय मोहिमांसाठी महत्त्वाचे आहेत.  शुभांशू यांचा अंतराळ प्रवास ही भारतीय अंतराळ संशोधनाची सुरुवात आहे. कारण, यानंतरच्या अनेक मोहिमा शुभांशू यांच्या अनुभवावर आधारित असतील. त्यातील पुढचीच महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणजे २०२७ साली होत असलेली ‘गगनयान’ ही मोहीम होय. यापूर्वी राकेश शर्मा यांनी रशियन संस्थेच्या मदतीने अंतराळ गाठले व आता शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या सहकार्याने अंतराळ सफर केली. मात्र, यापुढची गगनयान मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो राबविणार आहे. 

यामध्ये तीन अंतराळवीर भारतीय बनावटीच्या स्वदेशी यानामध्ये गगनभरारी घेतील. याची पूर्वतयारी म्हणून शुभांशू यांना अंतराळ केंद्रावर धाडले होते. अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती राहत नाही. या स्थितीत मानवावर होणारे परिणाम, तेथे वनस्पती उगवू शकतो काय, अतिसूक्ष्म जीव, मानव उपयोगी बॅक्टेरियांची वाढ कशी करता येईल, या सर्व गोष्टींवर गुरुत्वाकर्षण नसण्याचा (मायक्रो किंवा झिरो ग्रॅव्हिटी) काय प्रभाव पडेल, या जैविक प्रयोगांचा या मोहिमेत समावेश होता. 

‘गगनयान’ची लिटमस टेस्ट
गगनयान मोहिमेद्वारे भारतीय माणसे स्वत:च्या ताकदीने अंतराळात जातील. तेथे प्रयोग करणार आहेत. ही अभिमानाची गोष्ट ठरेल. यानंतर भारताचे स्वत:चे अंतराळ संशोधन केंद्र अवकाशात स्थापन करायचे आहे, जे इस्रोचे भविष्यातील लक्ष्य आहे. याद्वारे भारतीय तंत्रज्ञानाची ताकद जगाला दिसेल.

पंतप्रधान मोदी यांनी हा प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली होती. यामुळे येणारी पिढी विज्ञान, तंत्रज्ञान व अंतराळ संशोधनाकडे आकर्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शुभांशू यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

अंतराळातून मानवी संवाद कसा साधता येईल, या संवादाद्वारे कठीण परिस्थिती कशी हाताळता येईल, हे प्रयोग शुभांशू यांच्या मिशनचा भाग होते. येत्या काळात अंतराळ मोहिमांमध्ये या प्रयोगातील अभ्यासावर आणखी काम होईल आणि शुभांशू यांचा अनुभव त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. 

शुभांशू यांच्या प्रवासात 'हे' होते महत्त्वाचे प्रयोग

मानव-तंत्रज्ञान संवाद : सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात स्क्रीन डिस्प्लेवर, डोळे-हात समन्वयावर,  संज्ञानात्मक कार्यांवर मानवी वर्तनाचे विश्लेषण.

अंकुर आणि बियाणे उगवणे : अंतराळात मूग, मेथीचे बीज उगवणे आणि वाढीचा अभ्यास. अंतराळात शेतीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

अंतराळात पीक बियाणे : सहा पिकांच्या बियांच्या वाढ आणि बदलांचा अभ्यास. हा भारत-केंद्रित कृषी संशोधनाचा एक 
भाग आहे.

सूक्ष्म शैवाल-भविष्यातील सुपरफूड : स्पिरुलिना व सायनोकोससारख्या शैवालांच्या वाढीचे, प्रथिने उत्पादनाचे विश्लेषण. हे बंद-लूप लाइफ सपोर्ट सिस्टममध्ये उपयुक्त ठरतील.

टार्डिग्रेड सर्व्हायव्हल : अंतराळाच्या कठीण परिस्थितीत जगण्याचा आणि प्रजननक्षमतेचा अभ्यास.

प्रदर्शनांचा संज्ञानात्मक परिणाम : ताण, डोळ्यांची हालचाल आणि संगणक स्क्रीनशी संबंधित वापरातील बदलांचे विश्लेषण.

स्नायूंचे पुनरुत्पादन : सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात स्नायूंच्या पुनर्प्राप्ती आणि वाढीवर पौष्टिकपूरक आहारांचा परिणाम तपासला जाईल. हे मंगळ मोहिमेसाठी आणि पृथ्वीवरील स्नायूंच्या आजारांसाठी उपयुक्त ठरू शकते.

Web Title: The world will see India's strength! Gaganyaan gets strength from Shubanshu Shukla's experience, preparations for indigenous mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.