४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:36 IST2025-08-28T16:35:15+5:302025-08-28T16:36:18+5:30
माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. कटरा येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत या कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका नवविवाहितेचाही समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकडा गावातील चांदनी गोयल आपल्या पती मयंक गोयल, बहीण नीरा, मेहुणा अमित गोयल आणि १० वर्षांच्या भाचीसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. याचवेळी मंगळवारी अचानक झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत हे संपूर्ण कुटुंब भूस्खलनाच्या कचाट्यात सापडले. या दुर्घटनेत चांदनी गोयल आणि त्यांची बहीण नीरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अमित गोयल, मयंक गोयल आणि १० वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
या घटनेत जीव गमावलेली नीरा मूळची मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मवाना येथील रहिवासी होती. विशेष म्हणजे, मृत चांदनीचे अवघ्या चार महिन्यांपूर्वीच मयंक गोयलसोबत लग्न झाले होते. या घटनेची माहिती मिळताच खेकडा आणि मवाना गावांवर शोककळा पसरली. शोकाकुल कुटुंबियांनी तात्काळ कटरा येथे धाव घेतली आहे.
उपराज्यपालांकडून ९ लाखांची मदत जाहीर
वैष्णोदेवीत झालेल्या या भूस्खलनात आतापर्यंत ३२ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जखमींची भेट घेतली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डतर्फे ५ लाख रुपये आणि जम्मू-काश्मीरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ४ लाख रुपये दिले जातील.
या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. "आम्ही सर्वजण खूप आनंदाने दर्शनासाठी निघालो होतो, पण या एका घटनेने सारं काही हिरावून घेतलं," असे एका नातेवाईकाने सांगितले.