चांदोमामाच्या अंगणात ‘प्रग्यान’च्या बाललीला, ‘विक्रम’ने टिपलेल्या व्हिडीओचे केले वर्णन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 05:08 IST2023-09-01T05:08:19+5:302023-09-01T05:08:37+5:30
व्हिडीओबाबत इस्रोने लिहिलेल्या पोस्टला सर्वांनी दाद दिली आहे.

चांदोमामाच्या अंगणात ‘प्रग्यान’च्या बाललीला, ‘विक्रम’ने टिपलेल्या व्हिडीओचे केले वर्णन
बंगळुरू : चांदोमामाच्या अंगणात लहान मूल खेळताना त्याची आई जसे प्रेमाने पाहते तसेच काहीसे गुरुवारी झाले. हे काव्यमय वर्णन केले आहे इस्रोने. त्याला कारणही तसेच घडले. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित मार्गाच्या शोधात असताना प्रग्यान रोव्हरने स्वत:भोवती गिरकी घेतली. या हालचाली विक्रम लँडरमधील इमेजर कॅमेराने टिपल्या. त्या व्हिडीओबाबत इस्रोने लिहिलेल्या पोस्टला सर्वांनी दाद दिली आहे.
चांदोमामा, चांदोमामा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का असे गाणे आई आपल्या लहान मुलाला म्हणून दाखवते. आकाशात दिसणाऱ्या चांदोमामाचे प्रत्येकाला लहानपणापासून आकर्षण असते. त्या चांदोबावरील विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हरच्या घडामोडींबद्दल इस्रो हलक्याफुलक्या शब्दांत एक्स प्लॅटफॉर्मवर लिहित असलेल्या पोस्ट सर्वांना आवडत आहेत. चंद्रावर ज्वालामुखी, उल्कापात किंवा आणखी कोणत्या कारणाने गंधक सापडत असावे याबाबत आता संशोधन करावे लागणार आहे. तसे इस्रोने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. (वृत्तसंस्था)
एपीएक्सएसलाही लागला गंधकाचा शोध
प्रग्यान रोव्हरमधील अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपला (एपीएक्सएस) देखील चंद्राच्या पृष्ठभागावर गंधक व अन्य काही घटक आढळून आले. याआधी प्रग्यान रोव्हरमधील लेझर इन्ड्यूस्ड् ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (एलआयबीएस) या उपकरणाने चंद्रावरील गंधकाचा शोध लावला.
रंभा-एलपी पेलोडने केले चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील प्लाझ्माचे मापन
- विक्रम लँडरवरील रंभा-एलपी या पेलोडने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागाजवळच्या प्लाझ्माचे पहिलेवहिले मापन केले. तेथील प्लाझ्मा हा तुलनेने विरळ असल्याचे या निरीक्षणांतून दिसून आले.
- आयएलएसए पेलोडने केवळ प्रग्यान रोव्हर व अन्य पेलोडच्या हालचालींची नव्हे, तर चंद्रावरील एका नैसर्गिक घटनेची
२६ ऑगस्ट रोजी नोंद केली आहे. रंभा-एलपी पेलोडने केलेली निरीक्षणे भावी चंद्रमोहिमांसाठी उपयोगी ठरणार आहेत.